मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष चिघळत असल्याचे संकेत देणारे गंभीर विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडच्या दिल्ली दौर्यानंतर सत्ताधारी पक्षांत मतभेद वाढल्याच्या चर्चा सुरु असतानाच, अजित पवारांच्या मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला.
ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार प्रकरण बाहेर आले, पण सर्वप्रथम प्रश्न हा की घोटाळा झाला तरी झाला कसा? आणि झालाच तर तो बाहेर आलाच कसा? हे प्रकरण कोणी बाहेर काढले? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वर्षभरात अनेक प्रकरणे बाहेर येत असताना मुख्यमंत्री सतत ‘क्लिन चीट’ देतात, आरोप करणारेही तेच आणि न्यायमूर्तीही तेच अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारमधील लोकच एकमेकांची प्रकरणे उकरून समोर आणतात. पार्थ पवार प्रकरणाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, “प्रकरण बाहेर आल्यानंतर समोरच्याला दम देतात. तुमच्या विरोधातील फाईल आमच्याकडे आहे, लायकीत राहा नाहीतर टांगती तलवार डोक्यावर ठेवू,” असा संदेश सत्ताधाऱ्यांकडून दिला जातो.
सध्याचे सरकार एकमेकांना खाण्याच्या प्रयत्नात असून पक्षफोडीचे राजकारणच सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, बाजू बदलून गेलेले नेते बाजारबुणगेच ठरले आहेत.
भाजपाच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेचा उल्लेख करत ठाकरे यांनी भाजपावरही टीका केली. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपाला स्वतःच्या पक्षातील टोणगे, भ्रष्टाचार, हत्याकांड आणि अंमली पदार्थ तस्करीच्या आरोपांपासूनच आत्मनिर्भर होता आलेले नाही. यामुळे सत्ताधारी पक्षात परस्परांवरील अविश्वास वाढल्याचे त्यांनी दावा केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी खिल्ली उडवली. मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी एका लहान मुलासारख्या आवाजात “बाबा मला मारले म्हणून कोणीतरी दिल्लीत गेला” असे म्हणत शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. सत्ताधाऱ्यांमध्येच नसा आवळल्या जात असल्याचे ते म्हणाले आणि ही ‘लाचारी’ कशासाठी असा रोखठोक सवालही केला. महायुती सरकारमधील तणाव, आरोप–प्रत्यारोप आणि शक्तीपरीक्षेच्या राजकारणावर ठाकरे यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
-----------------------------
