आधुनिक जीवनशैलीतील अनियमित सवयी, ताणतणाव, चुकीचे खानपान, स्क्रीनसमोरील जास्त वेळ आणि शरीरातील पोषकतत्त्वांची कमतरता ही सततच्या थकव्यामागील प्रमुख कारणे होत आहेत. शरीरात आयरनची कमतरता झाल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते आणि पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि लक्ष विचलित होण्याची समस्या जाणवते. तसेच डिहायड्रेशन हेही एक गंभीर कारण आहे.
पाण्याच्या अभावामुळे इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडतो आणि ब्लड सर्क्युलेशन कमी प्रभावी होते. परिणामी चक्कर, डोकेदुखी आणि दिवसभर थकवा निर्माण होतो. ताणतणाव हे तर थकव्याचे सर्वात मोठे कारण मानले जाते. स्ट्रेसमुळे मेंदू सतत ‘हाय अलर्ट’ मोडमध्ये राहतो. चिंताग्रस्त, बेचैन आणि उदास भावना वाढतात आणि याचा थेट परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होतो. पूर्ण झोप न लागणे किंवा तुटक झोप होत राहणे ही सततच्या थकव्याची मोठी लक्षणे आहेत.
मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या ब्ल्यू लाइटमुळे मेंदूला सतत जागे राहण्याचा सिग्नल मिळतो. त्यामुळे शरीराचा नैसर्गिक स्लीप र्हिदम बिघडतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होते. अनेक वेळा लोक या गोष्टींवर दुर्लक्ष करतात, पण दीर्घकाळ अशा जीवनशैलीमुळे शरीराच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो. योग्य प्रमाणात पाणी पिणे, आयरनयुक्त आहार घेणे, स्क्रीनटाइम कमी करणे, ताणतणाव नियंत्रित करणे आणि नियमित दिनचर्या राखणे हे उपाय थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. सततचा थकवा दुर्लक्ष करता कामा नये, कारण ते शरीरातील इतर मोठ्या असमतोलाचे संकेत असू शकतात.
---------------------------------
