SBI बंद करणार mCash सेवा; 1 डिसेंबरपासून बदलणार ऑनलाइन पैसे ट्रान्सफरची पद्धत !

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI) ने आपल्या लोकप्रिय डिजिटल सेवा mCash संदर्भात मोठी घोषणा केली आहे. बँकेनुसार, 30 नोव्हेंबर 2025 नंतर OnlineSBI आणि YONO Lite वर mCash पाठवणे आणि दावा करणे ही सुविधा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या सेवेद्वारे ग्राहक लाभार्थी नोंदणी न करता मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीच्या आधारे पैसे पाठवू शकत होते. सेवा बंद झाल्यानंतर ग्राहकांना या पद्धतीने पैसे पाठवणे किंवा mCash लिंकद्वारे पैसे क्लेम करणे शक्य राहणार नाही.

SBI ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहकांना पर्यायी डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. थर्ड पार्टी बेनिफिशियरीला पैसे ट्रान्सफर करताना UPI, IMPS, NEFT आणि RTGS यांसारख्या सुरक्षित आणि व्यापक वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचा उपयोग करण्याची बँकेने सूचना केली आहे. बँकेच्या माहितीनुसार, 1 डिसेंबर 2025 पासून mCash ची सर्व सुविधा OnlineSBI आणि YONO Lite मधून काढून टाकली जाईल.

mCash सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा खूप सोयीची होती. Google Play Store वरून SBI mCash App डाउनलोड करून ग्राहक MPIN नोंदवून लॉग इन करू शकत होते. त्यानंतर दिलेल्या पासकोडच्या मदतीने कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकत होते. SBI ग्राहक लाभार्थी नोंदणीशिवाय फक्त रिसीव्हरचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून पैसे पाठवू शकत होते आणि रिसीव्हरला एक सुरक्षित लिंक व 8 अंकी पासकोड मिळत असे, ज्याद्वारे पैसे दावा करता येत.

SBI ने स्पष्ट केले आहे की सेवा बंद झाल्यानंतर ग्राहक UPI चा वापर करून सहजपणे पैसे पाठवू व स्वीकारू शकतात. SBI चे अधिकृत UPI अ‍ॅप ‘BHIM SBI Pay’ स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे पाठवणे, बिल पेमेंट, रिचार्ज, ऑनलाइन खरेदी अशा विविध सुविधांसाठी वापरले जाऊ शकते. BHIM SBI Pay मध्ये लॉग इन केल्यानंतर 'Pay' पर्याय निवडून VPA, खाते क्रमांक-IFSC किंवा QR कोडच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण केला जाऊ शकतो. आवश्यक माहिती भरल्यानंतर UPI PIN टाकून व्यवहार अधिकृत केला जातो.

SBI च्या या निर्णयामुळे mCash वापरणाऱ्या ग्राहकांनी आता UPI, IMPS, NEFT यांसारख्या पद्धतींवर अवलंबून राहावे लागणार असून बँकेने ग्राहकांना वेळेत पर्यायी साधनांचा वापर सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.



-------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने