चंद्रपूर : जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील अनेक भागात बिबट्यांनी उच्छाद मांडलेला असताना चंद्रपूरमध्ये मात्र वाघांनी दहशत निर्माण केली आहे. शेतात जाण्यास गावकरी काचरत आहेत, तर गुरं चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांच्या मनात सतत भीतीची छाया आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे संतप्त आणि त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी वनविभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याची मोठी चर्चा परिसरात सुरू आहे.
वाघांच्या वारंवार होणाऱ्या हालचाली व हल्ल्यांना रोखण्यासाठी मरेगाव परिसरात वनविभागाने गुराख्यांना आत्मरक्षणासाठी त्रिशूल आणि काही आवश्यक साहित्य दिले आहे. या पावलामुळे गुराख्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. आता हे त्रिशूलधारी गुराखी एकत्रितपणे शेतात जात असून, कळपाचे रक्षण अधिक सजगतेने करत आहेत. गावकऱ्यांच्या मते, वनविभागाने केलेली ही मदत त्यांच्या दैनंदिन पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी मोठा आधार ठरत आहे आणि असेच उपक्रम इतर गावांमध्येही राबवले जावेत.
याचबरोबर गुराख्यांनी स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी एक वेगळी शक्कलही लढवली आहे. पाठीमागील डोक्यावर मानवी चेहरा असलेला प्लास्टिक मास्क लावून ते शेतात जात आहेत, ज्यामुळे वाघाला मनुष्य त्याच्याकडे पाहत असल्याचा भास होतो आणि तो हल्ला करण्यापासून परावृत्त होतो, असा विश्वास ग्रामस्थांचा आहे. शिवाय, काही ठिकाणी साऊंड सिस्टम बसवून मोठ्या आवाजांचा वापर करून वाघांना पळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
ग्रामीण भागात मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने वाढत असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना राबवत आहे. आता या उपाययोजनांमध्ये त्रिशूल, प्लास्टिक मास्क आणि ध्वनी यंत्रणांचा समावेश झाला असून, या नव्या पद्धतींनी गावकरी सध्या तरी वाघांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
