दिल्ली : लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या स्फोटानंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढले असतानाच आता परिस्थितीत मोठा कलाटणीकारक बदल दिसत आहे. जगातील तब्बल 15 देशांनी खुल्या शब्दांत भारताच्या पाठीशी उभे राहत समर्थन जाहीर केले आहे. स्फोटानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेत i-20 गाडीत भरलेली स्फोटके वापरून मोठा घातपात करण्याचा दहशतवादी कट उधळून लावला गेला. पुलवामातील दहशतवादी उमर स्वतः गाडीमध्ये असून त्यानेच हा स्फोट घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. डीएनए चाचणीत उमरची ओळख शंभर टक्के पटली आहे. लाल किल्ला परिसरातील या भीषण स्फोटात 20 हून अधिक नागरिक जखमी झाले तर 9 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे समोर येत असून महिला डॉक्टर शाहीन सईद दहशतवाद्यांच्या थेट संपर्कात असल्याचा आरोपही तपासात पुढे आला आहे.
या हल्ल्यानंतर सैन्याने उमरच्या पुलवामातील घराचे विध्वंसन केले असून त्याच्या कुटुंबियांची कसून चौकशी सुरू आहे. भारताने हा स्पष्टपणे बॉम्बस्फोट असल्याचे जाहीर केले असून तपासाचे सर्व धागेदोरे अत्यंत महत्त्वाच्या दिशेने जात आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर भारताच्या समर्थनार्थ जगातील 15 महत्वाच्या देशांनी खुलेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. चीन, अमेरिका, कॅनडा, मलेशिया, इस्रायल, मिस्त्र, नेपाळ, जपान, अफगाणिस्तान, इराण, तुर्की, दक्षिण कोरिया, क्यूबा, साइप्रस आणि श्रीलंका या देशांनी भारतासाठी सहानुभूती आणि पूर्ण समर्थन व्यक्त केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश देत पीडित कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केल्या आणि “या कठीण काळात इस्रायल भारतासोबत ठामपणे उभा आहे,” असे जाहीरपणे म्हटले.
अमेरिकेनेही भारतातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे सांगितले. तसेच अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना सध्या लाल किल्ला परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या स्फोटानंतर दहशतवादाच्या नव्या पद्धती, विदेशी संपर्क आणि कट्टरपंथी जाळ्यांबाबत अनेक प्रश्न पुन्हा उभे राहिले आहेत.
दिल्लीतील या बॉम्बस्फोटाने केवळ देशालाच नव्हे तर जगालाही हादरवले असून, भारताच्या पाठीशी महत्त्वाच्या देशांचा वाढता पाठिंबा हा घटनाक्रम आता आंतरराष्ट्रीय राजनैतिक स्तरावरही महत्वाचा ठरत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
