ट्रम्प यांचा टॅरिफचा ‘तुघलकी’ डाव अंगलट; महागाईने जनता वैतागली, अनेक वस्तूंवरील शुल्क अखेर हटवले

नवी दिल्ली : अमेरिकेतील वाढत्या महागाईवरून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या विरोधकांनी त्यांच्या टॅरिफ धोरणालाच थेट जबाबदार धरले. जगभरातील देशांकडील आयातीवर मोठ्या प्रमाणात शुल्क वाढवल्यानंतर अमेरिका आर्थिक दबावाखाली गेली, तर सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली. 

या टीकेच्या धारेवर आणि जनतेच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने अखेर मवाळ भूमिका घेत काही महत्त्वाच्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बीफ, कॉफी, चहा, केळी, फळं आणि काही कृषी संबंधित उत्पादनांवरील शुल्क कमी केल्यामुळे अमेरिकन ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून अन्नधान्य आणि दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये मोठी महागाई दिसत होती. टॅरिफ वाढवल्याने परदेशातून आयात होणाऱ्या वस्तू महाग झाल्या आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर पडू लागला. त्यानंतर या वस्तूंवरील आयात शुल्क घटवल्याची घोषणा व्हाईट हाऊसकडून करण्यात आली.

या निर्णयाचा भारतासह अनेक निर्यातदार देशांना फायदा होणार आहे. कॉफी, चहा आणि फळांची अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात करणाऱ्या देशांना गेल्या टॅरिफ धोरणामुळे मोठा धक्का बसला होता. आता शुल्क कमी झाल्यामुळे या देशांच्या निर्यातीला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. भारतासाठीही कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेत पुनश्च संधी उपलब्ध होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महागाई वाढीला विरोधी पक्षांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला जबाबदार धरल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःही या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. अमेरिकन नागरिकांवरील आर्थिक भार कमी करणे आणि स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत अजूनही काही वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेत वाढत्या खर्चामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या निर्णयामुळे काही प्रमाणात आराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



     --------------------------------------------------------------------------------------------------------------------



 

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने