बेंगळुरू : पोलिसांनी कन्नड चित्रपटातील एका अभिनेत्रीचा छळ, धमकावणे, मानसिक त्रास देणे आणि ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर आरोपांमध्ये एक व्यावसायिकाला अटक केली आहे. आरोपीची ओळख अरविंद वेंकटेश रेड्डी अशी असून, राजराजेश्वरी नगर पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 78(2) (पाठलाग), 79 (महिलेच्या सन्मानाला धक्का), 352 (शांतता भंग), 351(2) (गुन्हेगारी धमकी) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. प्रकरण पुढे वाढू लागताच तपास गोविंद राजनगर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला आणि अखेर शनिवारी आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
36 वर्षीय अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलं आहे की, ती अरविंद रेड्डीला 2021 पासून ओळखते. 2022 मध्ये श्रीलंकेत झालेल्या एका कार्यक्रमात दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. सुरुवातीला मैत्रीचे सुरू झालेले संबंध पुढे लिव-इन रिलेशनशिपपर्यंत पोहोचले. पहिल्या काही महिन्यांत तो प्रेम दाखवायचा, मात्र नंतर त्याचा स्वभाव अचानक बदलत गेला. तो अनेकदा नशेत घरी परतायचा आणि हट्ट, राग आणि वर्चस्व गाजवण्याचा स्वभाव वाढत गेला.
त्यांचे वाद वाढू लागल्यानंतर अभिनेत्रीने त्याच्यापासून अंतर ठेवण्याचे प्रयत्न केले, पण त्यामुळे आरोपी अधिकच बेताल वागू लागला. आरोपानुसार, त्याने तिचा पाठलाग करणे सुरू केले, लोकेशन ट्रॅक करणे, तिच्या खाजगी छायाचित्रांमध्ये छेडछाड करून सोशल मीडियावर पोस्ट करणे आणि सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे असे प्रकार सुरूच राहिले. एवढ्यावर न थांबता काही अनोळखी लोकांना तिच्या घरी पाठवून त्रास देण्याचाही प्रयत्न केला.
तक्रारीत नमूद आहे की, रेड्डीने अभिनेत्रीच्या लहान भावाला ठार मारण्याची धमकी दिली आणि नातं कायम ठेवण्यासाठी सतत भावनिक ब्लॅकमेल केले. एप्रिल 2024 मध्ये मानसिक तणाव आणि शारीरिक छळ यामुळे अभिनेत्री इतकी खचली की तिने घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या वेळी आरोपी तिच्यावर लग्नाचा दबाव टाकत होता.
छळ सुरूच राहिल्यानंतर आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी केली आणि कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईकांसमोर मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सततचा पाठलाग, धमक्या, दडपशाही आणि मानसिक त्रास देणे हे त्याचे रोजचेच झाले होते. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याचा मोबाइल जप्त केला असून पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------------------------------------------
