मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकार दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा करते. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र महिला लाभ घेत असल्याचे तक्रारींमुळे सरकारने अनिवार्य KYC प्रक्रिया लागू केली आहे. KYC पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली असली तरी केवळ काही दिवस उरले असताना अजूनही प्रचंड संख्या KYCच्या प्रतीक्षेत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, राज्यातील एकूण 2.35 कोटी लाभार्थींपैकी तब्बल 1.3 कोटी महिलांनी अद्यापही KYC पूर्ण केलेली नाही. इतक्या मोठ्या संख्येने KYC प्रलंबित असल्यामुळे सरकार आता अंतिम मुदत वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका सुरू आहेत. त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या वातावरणात सरकार कोणताही कठोर निर्णय न घेण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे KYC न केलेल्या लाभार्थींना दिलासा मिळू शकतो. अपात्र महिलांची नावे वगळण्याचा निर्णयही निवडणुकांनंतरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेशिवाय लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढू नये, यासाठी KYC आवश्यक करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने KYC बाकी असल्यामुळे योजनेच्या नियमांमध्ये तात्पुरता शिथीलपणा आणण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
