पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रीय जनता दल (RJD) व महायुतीला झालेल्या पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेत परिवाराशी नाते तोडण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. सोशल मीडिया वर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी संजय यादव आणि रमीज यांच्या सल्ल्यानुसार हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले असून, “या सर्वाची जबाबदारी मी एकटी घेते,” असे स्पष्टोक्तीही दिले.
RJD ला या निवडणुकीत केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, यापूर्वीच लालू यादव यांनी मुलगा तेज प्रताप यादव याला एका सोशल मीडिया पोस्टमुळे घरातून आणि पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर तेज प्रताप यांनी स्वतंत्र राजकीय मंच तसेच ‘जनशक्ती जनता दल’ नावाचा पक्ष स्थापन केला; परंतु या नव्या पक्षाला सर्वच जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आणि महुआ ही त्यांची जिंकलेली ऐतिहासिक जागाही गमावावी लागली.
रोहिणी कोण? – वडिलांचे प्राण वाचवणारी कन्या
रोहिणी आचार्य यांचे नाव देशभरात तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी ५ डिसेंबर २०२२ रोजी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात आपल्या वडिलांना किडनी दान करून त्यांचे प्राण वाचवले. या त्यागासाठी त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक झाले होते.
परिवारातील नव्या फाटाफुटीचा टप्पा
RJD च्या झालेल्या पराभवानंतर लालू परिवारात निर्माण झालेल्या अस्थिरतेचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तेज प्रताप याला पक्षातून काढल्यानंतर रोहिणीने घेतलेला निर्णय परिवारातील मतभेद आणखी तीव्र झाल्याचे दर्शवतो. महागठबंधनातील पराभवाची जबाबदारी, संघटनातील विस्कळीतपणा आणि अंतर्गत तणाव यांचा परिणाम म्हणून हा निर्णय पाहिला जात आहे.
सिंगापूरमध्ये स्थायिक, संपत्ती अब्जावधींची
रोहिणी आचार्य सिंगापूरमध्ये पती व तीन मुलांसह राहतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ३६.६ कोटी रुपयांची मालमत्ता असून, त्यांनी आपला व्यवसाय ‘सामाजिक सेवा’ असा नमूद केला आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा किंवा प्रलंबित प्रकरण नाही.
MBBS शिक्षण घेतलेल्या रोहिणीचा जन्म १९७९ मध्ये पटण्यात झाला. महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, जमशेदपूर येथून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. लालू प्रसाद यादव यांच्या सात मुलींमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकाच्या कन्या आहेत.
राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाच्या वळणावर रोहिणी
कधीकाळी वडिलांचे प्राण वाचवणारी आणि RJD चे मजबूत चेहरा म्हणून ओळख मिळवलेली रोहिणी आज स्वतःच परिवारापासून दूर जाण्याची वेळ आल्याचे बोलतात. महागठबंधनाच्या पराभवाच्या पडसादांनी लालूपरिवारात निर्माण झालेल्या अंतर्गत संघर्षाला आता रोहिणींच्या निर्णयाने नवे वळण मिळाले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
