अहिल्यानगर : महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि मान्यवर कीर्तनकार इंदुरीकर महाराज काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या कन्येचा साखरपुडा संगमनेर येथे राजेशाही थाटामाटात पार पडला आणि त्यानंतर सोशल मीडियावरून महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र धूमधडाक्यात करतात, अशा स्वरूपाच्या वैयक्तिक टीका सोशल मीडियावर करण्यात आल्या. विशेषत: मुलीच्या पेहरावावरून आणि सोहळ्याच्या भव्यतेवरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणींमुळे महाराज मानसिकदृष्ट्या व्यथित झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर महाराजांनी कीर्तनसेवा थांबवण्याचे संकेत दिल्याची चर्चा रंगत असतानाच आता बदगी येथील व कीर्तनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी टीकेवर अत्यंत थेट भाष्य केलं असून, “लग्न जोरात करणार... काय बोंबलायचंय बोंबला?” असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर नवे वादंग निर्माण झाले आहेत. याच कीर्तनात त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला आणि 30 मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटी रुपयांचा खर्च होतो, तेव्हा चॅनेलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून येतात हे विचारावे, असा सवाल उपस्थित केला.
इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात पार पडला. रथावरून काढलेली राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांनी खच्चून भरलेले सभागृह, वारकरी वेशातील टाळकरी आणि महिलांचा पारंपरिक फेर या सर्व गोष्टींमुळे हा सोहळा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराजांवर ‘उपदेश एक आणि आचरण वेगळे’ अशी टीका करण्यात आली.
महाराजांचे जावई साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक असून ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहेत. उच्च शिक्षण घेतलेले साहिल चिलाप यांच्या कुटुंबाची गावाकडे बागायती शेती आहे, तसेच शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. साखरपुड्यामुळे महाराजांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष केंद्रीत झाले असून या आनंदाच्या क्षणांवरूनही वाद आणि चर्चांना उधाण आल्याचे दिसत आहे.
------------------
