सातारा : साताऱ्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीत मोठा गोंधळ उडवत प्रभाग क्रमांक तीनमधील ३ ब सर्वसाधारण महिला राखीव जागेवर एका पुरुषाने दाखल केलेला उमेदवारी अर्ज छाननीतही वैध ठरल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राज्यात सुरू असलेली रणधुमाळी आणि साताऱ्यात तापलेले वातावरण यामध्ये या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक तीनमधील या जागेसाठी एकूण सात अर्ज आले असून त्यापैकी सहा महिला उमेदवार आहेत, तर एका पुरुषाने दाखल केलेला अर्जही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारला आहे.
भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरपालिका प्रभारी यांनी ही बाब पुढे आणत, महिला राखीव जागेवर पुरुष उमेदवाराचा अर्ज कसा स्वीकारला गेला, छाननीदरम्यान नेमकं तपासणीनं काय पाहिलं, असा सवाल उपस्थित केला आहे. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव जागेवर पुरुषाचा अर्ज वैध ठरणे ही अत्यंत गंभीर चूक मानली जात असून यामागे दुर्लक्ष झाले की नियमावलीची चुकीची व्याख्या झाली, याबाबत प्रशासनातून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.
अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता छाननी प्रक्रियेत अशा चुका समोर येत असल्याने निवडणूक व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होत असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. नोव्हेंबरपासूनच आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे.
साताऱ्यासह जिल्हाभरातील राजकीय वातावरण निवडणूक घोषणेनंतर आधीच तापलेले असताना महिला राखीव जागेत पुरुषाचा वैध नामांकन अर्ज हा नवीन वादंग निर्माण करणारा ठरला आहे आणि यावर पुढील काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
/
