रावळपिंडी : पाकिस्तानात माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या कुटुंबावर थेट प्रहार सुरू झाला आहे. लष्कराच्या विरोधात आवाज उठवल्याची किंमत आता त्यांच्या घरच्यांना चुकवावी लागत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगाबाहेर इमरान खान यांच्या तीन बहिणींना, अलीमा, उजमा आणि नौरीन यांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत, ढकलत आणि अपमानास्पद पद्धतीने ताब्यात घेतलं. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले असून पाकिस्तानभर संतापाची लाट उसळली आहे.
इमरान खान एकांतवासात शिक्षा भोगत असून त्यांच्या बहिणी त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचल्या होत्या. मात्र तुरुंग प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर त्या शांततेने बाहेर बसल्या होत्या. तेवढ्यात पोलिस पथक धडकलं आणि कुठलीही सूचना न देता महिलांवर दडपशाही सुरू केली.
“मी तिथे शांत उभी होते. अचानक पोलिस आले, मला पकडलं, जमिनीवर फेकलं. एका जाड महिला पोलीस अधिकाऱ्याने माझे खांदे पकडले, पाय ओढत मला रस्त्यावर फरफटवलं… ते इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात याचा मला धक्का बसला.” असं इमरान खान यांच्या बहिणी नौरीन खान यांनी थरथरत सांगितलं.
पीटीआय पक्षाच्या माहितीनुसार, पोलिसांनी केवळ बहिणींनाच नव्हे तर पार्टीचे नेते, महिला पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांनाही अत्यंत हिंसक पद्धतीने ताब्यात घेतलं. मीना खान अफ्रिदी, एमएनए शाहिद खट्टक यांच्यासह अनेक जणांना रबराच्या काठ्यांनी मारहाण करत अटक केल्याचंही समोर आलं आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये अलीमा, उजमा आणि नौरीन यांच्या भोवती प्रचंड गर्दी दिसते. नौरीन घाबरलेली, हादरलेली आणि बोलताना थरथरताना दिसते. पोलिसांनी तिचे केस पकडून जमिनीवर पाडल्याचा आरोप तिने केला आहे.
इमरान खान हे राजकीय कैदी असून त्यांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र हा अधिकार त्यांना दाबण्यासाठी, मानसिक छळ देण्यासाठी आणि कुटुंबाला त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक तोडला जातोय, असा गंभीर आरोप पीटीआयने केला आहे.
पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता आणि लष्कराच्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर इमरान खान यांच्या कुटुंबावर वाढणारी दडपशाही देशातील मानवी हक्कांच्या स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
---------------------------
\
