नवी दिल्ली : आंध्र ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर चालवलेल्या मोठ्या मोहिमेत कुख्यात माओवादी कमांडर मेतुरी जोखा राव उर्फ टेक शंकर ठार. त्याच्यासह एकूण 7 नक्षलवाद्यांचा खात्मा, ज्यात तीन महिला माओवादी असल्याची अधिकृत माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आली आहे. अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगल पट्ट्यात बुधवारी सकाळी 7 वाजता ही मोठी चकमक उडाली.
जोखा राव हा AOB (आंध्र–ओडिशा बॉर्डर) विभागातील केंद्रीय समितीशी संबंधित टॉप कमांडर होता. नक्षल संघटनेत तो तांत्रिक नेटवर्क, कम्युनिकेशन आणि ऑपरेशन प्लॅनिंगचा मेंदू मानला जायचा. तब्बल 20 वर्षांपासून जंगलात सक्रिय, दक्षिण भारतातील नक्षलवाद पुन्हा मजबूत करण्याचा त्याचा डाव सुरक्षा दलांनी मोडून काढला.
चकमक सुरू झाल्यानंतर मारेदुमिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम, घेराव आणि फायरिंग तासन्तास सुरू राहिली. लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केल्याने ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले. मृतांमध्ये हिडमाच्या इतर सहकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सुरक्षादलांनी परिसरातून शस्त्रे, साहित्य आणि कम्युनिकेशन उपकरणे जप्त केली आहेत.
या ऑपरेशननंतर आंध्रप्रदेश पोलिसांनी शहर भागातही माओवादी नेटवर्कवर धडक कारवाई केली. एल्लूर येथील ग्रीन सिटी भागातून १० पुरुष आणि ५ महिला माओवादी अनुयायी ताब्यात घेतले, तसेच त्यांचे काही शस्त्रेही जप्त केले आहेत. हिडमा आणि जोखा रावच्या मृत्यूमुळे छत्तीसगड, गडचिरोली, तेलंगणा, आंध्र आणि उडिशामधील माओवादी संघटनेची दहशत लक्षणीय घटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आता केंद्रीय गृह विभागाचे लक्ष्य देवजी आणि गणपती या उर्वरित दोन टॉप माओवादी कमांडरकडे आहे. मार्च 2026 पर्यंत आत्मसमर्पण करा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा असा अल्टिमेटम केंद्र सरकारने दिला आहे.
चार राज्यांतील संयुक्त पथकांनी ‘सर्च आणि नष्ट करा’ ही रणनीती गतीने राबवण्यास सुरुवात केली आहे.
------------------------------------------------
