नागपूर : भांडेवाडी परिसरात आज पहाटेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी साधारण सातच्या सुमारास एका घराजवळ बिबट दिसल्याचा दावा स्थानिकांनी करताच क्षणातच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. काही नागरिकांनी तर बिबट एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शिरल्याचे सांगितले. माहिती मिळताच परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी जमा झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनलं. अनेकांनी घरातच थांबण्याचा सल्ला देत महिलांना आणि मुलांना बाहेर न पडण्यास सांगितले.
स्थानिकांनी "हेल्प फॉर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर" यांना माहिती दिल्याने त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात मोठ्या वन्यप्राण्याच्या हालचालींची पुष्टी केली. त्यानंतर नागपूर जिल्हा वन्यजीव वॉर्डन अजिंक्य भाटकर तसेच टीटीसी सेंटर यांना सतर्क करण्यात आले. घराच्या अंगणात मोठ्या आकाराचा प्राणी पाहिल्याचा दावा नागरिकांनी केला असून “तो बिबटाच होता, आम्ही स्पष्ट पाहिलं!” असा दावा अनेकांनी केला. काहींनी मात्र तो मोठा कुत्रा किंवा दुसरा वन्यप्राणी असू शकतो, असा अंदाज वर्तवला. तरीही दहशतीचे वातावरण कायमच आहे.
गर्दी, गलका, अफवा… काही वेळातच भांडेवाडी परिसर अक्षरशः कोंडाळं झालं. व्हिडिओ काढणाऱ्यांचा ओघ इतका वाढला की, घरासमोर वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना मागे हटण्याचे आवाहन करत होते, परंतु जिज्ञासूंची गर्दी थांबण्याचे नाव घेत नव्हती. वनविभागाचे अधिकारी येत आहेत, ही बातमी समजताच सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे खिळले.
अद्याप हाती आलेल्या माहितीनुसार वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची तपासणी सुरू आहे. सापळा लावणे, प्राण्याच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देणे—ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे. नागपूरच्या बाहेरील पट्ट्यात वाघ–बिबटे दिसण्याच्या घटना वाढत आहेत, परंतु शहरातील निवासी भागात बिबट शिरल्याची बातमी अत्यंत गंभीर मानली जात आहे.
खरोखरच बिबट शिरला आहे का? किंवा सकाळच्या गोंधळामुळे अफवा पसरली आहे? याबाबत वनविभागाचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच खात्री होणार आहे. त्याआधी सर्व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे.
-----------------------------------------
