मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिक तापले आहे. सत्ताधारी महायुतीने तिन्ही पक्ष एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केलेला असतानाच विरोधी महाविकास आघाडीत मात्र मतभेदांचा भडिमार सुरू आहे. काँग्रेस पक्षाने मनसेसोबत आघाडी असल्यास आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाणार नाही, अशी भूमिका उघडपणे व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीचे समीकरणच डळमळू लागले. या घडामोडींच्या काही तासांतच खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले संजय राऊत सध्या विश्रांती घेत असले तरी राज्यातील राजकीय घटनांवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर राऊत यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून एक पोस्ट करत ठाकरेंचा स्पष्ट पवित्रा जाहीर केला आहे. “दिल्लीतून आदेश येईपर्यंत मनसेला आघाडीत घेणार नाही, हे मुंबई काँग्रेसचे मत असू शकते. पण शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. ही लोकांची इच्छा आहे,” असे राऊत यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने ठाकरे गट आणि मनसे युतीबाबतची भूमिका स्पष्ट झाली असून काँग्रेसवर त्यांनी अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले आहे.
राऊत इथेच थांबले नाहीत. काँग्रेसला उद्देशून त्यांनी “शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आहेत. त्यासाठी कुणाच्या आदेशाची किंवा परवानगीची गरज नाही,” अशी थेट विशेष टिप्पणी केली. यासोबतच शरद पवार आणि डावे पक्ष हे देखील या समीकरणात सकारात्मक असून ‘मुंबई वाचवा’ या भावनेतून काँग्रेसनेही सोबत यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. दुसरीकडे, मनसेसोबत आघाडी नको या काँग्रेसच्या भूमिकेनंतर शरद पवार यांची भूमिका मात्र काहीशी भिन्न असल्याचे दिसते. ठाकरे आणि मनसे यांच्यासोबत जाण्यासंदर्भात ते सकारात्मक असल्याच्या चर्चा गतीमान आहेत.
आता काँग्रेस आपला निर्णय कायम ठेवणार का, की बदलणार? ठाकरे गट आणि मनसेची जवळीक पाहता महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढवू शकेल का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिका निवडणूक राज्यातील प्रतिष्ठेची लढाई बनल्याने प्रत्येक पक्षाने आपला पवित्रा अधिक कडक केला असून संजय राऊतांच्या एका ट्वीटमुळे या समीकरणात मोठ्या बदलांची शक्यता निर्माण झाली आहे.
--------------------------------
