नवी दिल्ली : ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जागतिक ख्यातीच्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा जगाला धक्का देणारा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक क्रॅश सुरू झाला असून हा केवळ अमेरिका नव्हे तर संपूर्ण युरोप आणि आशिया खंडालाही झटका देत आहे. आर्थिक घडामोडींवर केलेल्या अत्यंत थेट आणि बेधडक भाष्यामुळे प्रसिद्ध असलेल्या कियोसाकी यांचा हा इशारा वेगाने व्हायरल झाला आहे.
कियोसाकी म्हणतात की, हा भयंकर क्रॅश नेमका तसाच आहे जसा त्यांनी २०१३ मध्ये ‘Rich Dad’s Prophecy’ या पुस्तकात भाकीत केला होता. त्या पुस्तकात त्यांनी स्पष्ट लिहिले होते की इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक घसरण येणार आहे आणि त्याची चाहूल आता प्रत्यक्षात दिसत आहे. वाढती महागाई, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि बँकिंग व्यवस्थेवरील ताण यामुळे हा संकटकाल अधिक गंभीर बनला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा क्रॅश रोजगार, उद्योग आणि आर्थिक बाजारपेठांच्या मुळावरच घाव घालू शकतो.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना सोने, चांदी, बिटकॉइन आणि एथेरियम यांची खरेदी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नोकऱ्या नष्ट होणार आहेत आणि जेव्हा रोजगार प्रणाली कोसळेल तेव्हा कार्यालये-घरांसह रिअल इस्टेट सेक्टरही मोठ्या प्रमाणात क्रॅश होईल. या परिस्थितीत सोने-चांदीसारख्या धातू आणि क्रिप्टोकरन्सी हेच सुरक्षित आश्रयस्थान ठरतील, असा त्यांचा ठाम दावा आहे.
त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी विशेषत: चांदीचे भविष्य अत्यंत तेजीत असल्याचे म्हटले आहे. सध्या चांदीचा भाव सुमारे ५० डॉलर प्रति औंस आहे; परंतु लवकरच तो ७० डॉलरपर्यंत जाण्याची आणि २०२६ पर्यंत तब्बल २०० डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. इतक्या मोठ्या क्रॅशमध्येही चांदी गुंतवणूकदारांना श्रीमंत करू शकते, असे कियोसाकी यांचे म्हणणे आहे. त्यांनी इशारा देताच स्पष्ट केले की “लाखो लोक सर्व काही गमावतील, पण तुम्ही तयार असाल तर हेच संकट तुम्हाला अधिक श्रीमंत बनवू शकते.”
कियोसाकी यांचा इतिहास पाहता त्यांनी याआधीही अनेक वेळा सोनं-चांदी आणि बिटकॉइन यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पारंपरिक शेअर-बॉण्ड बाजारपेठांना ते “नकली चलनव्यवस्था” असे संबोधतात आणि खऱ्या संपत्तीचे स्रोत म्हणून सोने-चांदी व क्रिप्टो ऍसेट्सकडे पाहण्याचा सल्ला सतत देत असतात.
--------------------------------------
