फार्महाउसवर एनसीबीची मोठी कारवाई; २६२ कोटींचे ड्रग्ज जप्त, सेल्स मॅनेजर आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा मास्टरमाइंड !



नवी दिल्ली : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने छेडलेल्या मोठ्या अँटी-नार्कोटिक्स ऑपरेशनमध्ये तब्बल २६२ कोटींहून अधिक किंमतीचा मेथाम्फेटामिन साठा जप्त करण्यात आला आहे. हे ऑपरेशन राजधानीतील एका फार्महाउसवरील रेडपासून सुरू झाले. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे एनसीबीने सलग तीन दिवस तपास आणि छापेमारी केली. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत सिंथेटिक ड्रग नेटवर्कचा मोठा भांडाफोड झाला आहे. प्रारंभिक चौकशीतच असे स्पष्ट झाले की, हा संपूर्ण रॅकेट परदेशी ऑपरेटरांच्या थेट निर्देशांनुसार काम करत होता. दिल्ली-एनसीआर परिसरातील अनेक ठिकाणी गुप्तपणे देखरेख वाढवण्यात आली आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.

या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून एनसीबीने नोएड्यातील सेक्टर-५, हरौला येथे राहणाऱ्या २५ वर्षीय शेन वारिसला अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मंगरौली गावचा रहिवासी असून एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. चौकशीत असे समोर आले की, शेन वारिस आपल्या "बॉस" च्या आदेशानुसार फेक सिमकार्ड, व्हॉट्सॲप आणि ‘जांगी’ सारख्या एन्क्रिप्टेड चॅट ॲप्सचा वापर करीत होता, जेणेकरून त्याचे लोकेशन किंवा संपर्क सहज ट्रेस होऊ नयेत. 

२० नोव्हेंबर २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आल्यावर शेनने सिंडिकेटमधील आपल्या भूमिकेची कबुली दिली. चौकशीत त्याने एस्टर किमीनी नावाच्या महिलेसह संपूर्ण साखळीबाबत महत्त्वाची माहिती दिली. या महिला संपर्काच्या माध्यमातून मोठा ड्रग्ज कन्साइनमेंट पोर्टर रायडर्सद्वारे हलवण्यात येत असल्याची माहितीही त्याने उघड केली.

शेनने दिलेल्या माहितीनुसार एनसीबीने त्याच दिवशी छतरपूर एन्क्लेव फेज-२ येथील एका घरावर छापा टाकला. येथे तब्बल ३२८.५४ किलो मेथाम्फेटामिन असा प्रचंड साठा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी आणि प्रभावी कारवाई असल्याचे एनसीबीने नमूद केले आहे. या ड्रग नेटवर्कचे परदेशी कनेक्शन, स्थानिक साथीदार, पुरवठ्याचे मार्ग, आर्थिक देवाणघेवाणीची पद्धत याबाबतही अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याने एजन्सी आता संपूर्ण सिंडिकेटचा विस्तार उघड करण्यासाठी पुढील तपास वेगाने करत आहे.


 ----------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने