पंचमढी : मध्य प्रदेशातील पंचमढी येथे आयोजित काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रात एक अनोखा प्रसंग घडला. काँग्रेस नेते राहुल गांधी सत्राला २० मिनिटे उशिरा पोहोचल्याने त्यांना शिबिरात ठरवलेल्या शिस्तीच्या नियमांनुसार १० पुशअप मारण्याची शिक्षा देण्यात आली. या घटनेमुळे प्रशिक्षण सत्रात उपस्थित सर्व नेते आणि कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले, तर राहुल गांधींनीही हसत-हसत शिक्षा स्वीकारत वातावरण हलकेफुलके केले.
पंचमढी येथील या काँग्रेस प्रशिक्षण सत्रात उशीरा येणाऱ्यांना ‘टाईम मॅनेजमेंट’चे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रतिकात्मक शिक्षेचा नियम ठेवण्यात आला होता. सत्र प्रमुख सचिन राव यांनी मजेत राहुल गांधींना सांगितले की उशिरा येणाऱ्यांना १० पुशअप काढावे लागतात. त्यावर राहुल गांधींनी “ठीक आहे” असे म्हणत कोणताही विलंब न करता मंचावरच १० पुशअप मारले. या कृतीने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
यानंतर राहुल गांधींनी नव्या जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या, पक्षशिस्त आणि स्थानिक स्तरावरील कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यावर भर दिला.
दरम्यान, पंचमढीमधील भाषणात राहुल गांधींनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. त्यांनी ‘व्होट चोरी’चा आरोप करत म्हटले की, हरियाणामध्ये सुमारे २५ लाख मतदारांचे मत चोरले गेले होते आणि आता मध्य प्रदेशातही तशाच प्रकारच्या अनियमितता झाल्याचा पुरावा आमच्याकडे आहे. राहुल गांधी म्हणाले की, “मुख्य मुद्दा म्हणजे ‘व्होट चोरी’. आम्ही एकेक पुरावे सार्वजनिक करू.”
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्यांनी जोरदार पलटवार केला. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी सोशल मीडियावर टीका करत म्हटले की, “राहुल गांधी हे ‘लीडर ऑफ ऑपोजिशन’ नव्हे तर ‘लीडर ऑफ टुरिझम’ आहेत.” त्यांनी आरोप केला की, बिहार निवडणूक प्रचार सुरू असताना राहुल गांधी पंचमढीत जंगल सफारीचा आनंद घेत आहेत.
या घटनेनंतर राहुल गांधींच्या 10 पुशअप्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, काँग्रेस समर्थकांनी त्यांचे ‘ग्राउंड टू रिॲलिटी’ व्यक्तिमत्व म्हणून कौतुक केले आहे.
---- समाप्त ----
