प्रचाराच्या मैदानात रक्ताचा सडा! निवडणूक प्रचारादरम्यान दगडफेक, थेट तलवारीचे हल्ले; पाथरीत तणावाचा उच्चांक


परभणी : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना पाथरी तालुक्यात गंभीर हिंसाचार उफाळून आला आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक प्रचाराला वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार, शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये थेट दगडफेक आणि तलवारीने हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. निवडणुकीच्या उत्साहावर रक्ताच्या सड्याचा डाग पडताच संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रचारादरम्यान दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आणि पाहता पाहता परिस्थिती चिघळत गेली. जमाव आक्रमक झाला आणि दोन्हीकडून दगडफेक सुरू झाली. या वादाला हिंसक वळण मिळताच काही जणांनी थेट तलवारी आणि चाकू काढत एकमेकांवर जीवघेणे हल्ले केले. तलवारीचे वार, दगडफेकीमुळे अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून काहींच्या डोक्यास टाके घालावे लागले आहेत. जखमींना तात्काळ परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गावात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा तैनात केली. या प्रकरणी काँग्रेस व शिंदे शिवसेना गटाने एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. पाथरीतील सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सेलू शहरात सपकाळ कार्यक्रमासाठी पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले तसेच ‘देवेंद्र फडणवीस जिंदाबाद’च्या घोषणा देत वातावरण तापवले. पाथरीत सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या तीव्र टीका केल्यामुळे हा विरोध उफाळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकारण आता चांगलेच तापले असून पाथरीतील हिंसक घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वाढता तणाव पाहता पोलिस सतर्क झाले असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी कडक पावले उचलत आहेत. आगामी दिवसांत प्रचार आणखी उग्र होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्व उमेदवार व पक्षांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.



    -----------------------------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने