मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तणाव चव्हाट्यावर आला आहे. भाजपात सुरु असलेल्या मोठ्या इनकमिंगचा सर्वाधिक फटका हा भाजपच्या मित्रपक्षांना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसत आहे. या इनकमिंगमुळे उमेदवारी समीकरण बिघडल्याने शिंदे गटात नाराजी शिगेला पोहोचली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्यानंतर सुरू झालेले नाराजीनाट्य आता थेट एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून बाहेर पडले आहे. भाजपाच्या नेतृत्वावर त्यांनी पहिल्यांदाच उघड टीका केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आले. त्यांच्या या भेटीनंतर महायुतीतील मतभेद मिटणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र डहाणू नगर परिषद निवडणुकीतील प्रचारसभेत शिंदे यांनी केलेल्या विधानांनी राजकीय वातावरण उलटच तापवले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माच्ची यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला.
सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, “एवढे उमेदवार आणि इतके कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर समोरच्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या उमेदवारांनी आपले उमेदवार मागे घेतले यांचे अभिनंदन. डहाणू नगर परिषदेत परिवर्तनाचा भगवा फडकणार आहे. डहाणूचा समुद्र जसा विशाल आहे, तशीच येथील लोकांची मनंही मोठी आहेत. या अफाट गर्दीवरून राजू माच्ची यांचा विजय निश्चित आहे.”
यावेळी भाजपचे नाव न घेता शिंदेंनी पहिल्यांदाच स्पष्ट शब्दांत टीका केली. “एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात आपण आता एकत्र आलो आहोत,” असे म्हणत त्यांनी भाजपला थेट टोला लगावला. राजू माच्ची यांच्या ‘निषाणी’वर शिक्का मारण्याचे आवाहन करत त्यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करा, असे सांगितले.
शिंदे यांचे हे वक्तव्य महायुतीतील आंतरिक तणावाचे स्पष्ट द्योतक मानले जात आहे. भाजपातील इनकमिंगमुळे शिंदे गटाचे स्थानिक पातळीवरील समीकरण ढासळत असल्याची खदखद आता त्यांच्या भाषणातून उफाळून आली आहे. या वक्तव्यामुळे महायुतीतील सध्याचा सुसंवाद प्रश्नचिन्हाखाली येऊन थांबला असून येत्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम कसे दिसतील याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ अबोलपणे लक्ष ठेवून आहे.
---------------------------
