अनोखा प्रयोग; घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी, चर्चांना उधाण !

नांदेड : जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या ताकदीची परिक्षा मानल्या जातात, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा वावर वाढताना दिसत आहे. लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत या वास्तवाची ठळक झलक पाहायला मिळाली आहे.

काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपनेच या वेळी एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्यांना उमेदवारी दिल्यामुळे हा मुद्दा मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली असून याच कुटुंबातील इतर पाच जणांनाही नगरसेवक पदासाठी तिकीट देण्यात आले आहे. गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावजय सुप्रिया सूर्यवंशी, मेव्हणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाजपच्या "घराणेशाहीविरोधी" भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

स्थानिक राजकारणात आधीच असलेल्या गटबाजी, जातीय समीकरणं आणि वैयक्तिक प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आता या उमेदवारींमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

विरोधकांनी भाजपवर "आपल्या सोयीनुसार मूल्यं बदलणारा पक्ष" अशी टीका करताना या निवडीमागील राजकीय गणितावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र या उमेदवारीला "जिंकून आणू शकणाऱ्या मजबूत कुटुंबावर ठेवलेला विश्वास" असे प्रतिपादन करत आहेत.

लोहा नगरपरिषद निवडणूक त्यामुळे केवळ विकासाच्या अजेंड्यापुरती मर्यादित न राहता घराणेशाही, राजकीय नैतिकता आणि स्थानिक नेतृत्वाची निवड या सगळ्यांचीच मोठी परिक्षा ठरणार आहे. या तिरंगी लढतीत मतदार कोणावर विश्वास ठेवतात, यावर नांदेडच्या स्थानिक राजकारणातील पुढील समीकरणे अवलंबून राहतील.


             ---------------------------------------------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने