AI मुळे नोकऱ्या जाण्याचे संकट? पण कुशल कामगारांच्या प्रचंड तुटवड्याकडे दुर्लक्ष; आनंद महिंद्रांची चेतावणी चर्चेत !

मुंबई : AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे अनेक क्षेत्रातील हजारो नोकऱ्या नष्ट होतील, या भीतीने जगभरातील तरुणाई तसेच उद्योगक्षेत्र चिंतेत आहे. या संदर्भातील चर्चेची जोरदार लाट निर्माण झाली झाली आहे. मोठ्या कंपन्यांचे अधिकारी, विश्लेषक आणि तज्ञ याप्रकरणी सतत इशारे देताना दिसत आहेत. पण या चर्चेच्या गदारोळात एक मोठी आणि महत्वपूर्ण समस्या झाकली जात आहे. यावर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

 फोर्ड मोटर कंपनीचे सीईओ जिम फार्ले यांच्या विधानाचा दाखला देत महिंद्रा यांनी सांगितले की, समाज व्हाईट कॉलर नोकऱ्यांवरील संकटाबाबत इतका गडबडलेला आहे की, अर्थव्यवस्थेच्या पायाभूत चाकांवर येऊ घातलेल्या कुशल कामगारांच्या प्रचंड तुटवड्याकडे दुर्लक्ष होत आहे. समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, पदवी, कार्यालयीन डेस्क नोकऱ्या आणि ‘प्रतिष्ठित’ करिअर यांना समाजाने अनेक दशकांपासून सर्वोच्च स्थान दिले, पण प्रत्यक्ष कामावर आधारित, हातकौशल्य आणि अनुभवावर टिकलेल्या व्यवसायांना मागे ढकलले. यामुळे एक अशी पिढी निर्माण झाली आहे जी पारंपरिक पण उच्च-मूल्य कौशल्य असलेल्या कामांपासून दूर गेली आहे.

 महिंद्रा यांनी हेही स्पष्ट केले की अशा नोकऱ्या मेकॅनिक, मशीन ऑपरेटर, वेल्डर, तांत्रिक तज्ज्ञ, मजूर-आधारित क्षेत्रातील कुशल कामगार  हीच ती कामे आहेत ज्यांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही, कारण त्यासाठी केवळ ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव, निर्णयक्षमता आणि कौशल्यांची जोड आवश्यक असते. 

त्यांनी विचारले की समाज ज्याला ‘आकर्षक करिअर’ म्हणून पाहतो, त्याचे परिमाण आता बदलणार का? एआय युगातील खरे विजेते कोडर किंवा ऑफिसमध्ये बसणारे कर्मचारी नसून प्रत्यक्ष कौशल्ये असलेले कामगार असू शकतात, असे त्यांचे मत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनीही अमेरिकेत शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक काम करण्यास सक्षम किंवा तसे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक लोकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याचे सांगत या संकटाकडे लक्ष वेधले. 

आनंद महिंद्रा आणि एलॉन मस्क यांच्या सूचनांमुळे एआयच्या भीतीपलीकडे प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवर गदा आणू शकणारा कुशल कामगारांचा तुटवडा हा विषय आता चर्चेत आला आहे.


            

          ------------------------------------------------------------------------------------------------------------






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने