घटस्फोटाच्या चर्चांनी वैतागली अभिनेत्री ऐश्वर्या; ट्रोलिंगवर क्रिप्टिक पोस्टमधून कडाडून प्रत्युत्तर

 


टेलिव्हिजनवर झळकणारी लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलिंगला आणि वैवाहिक आयुष्याविषयी सुरू असलेल्या चर्चांना तोंड देत आहे. तिच्या आणि अभिनेता नील भट्ट यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाल्याच्या, तसेच दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा मनोरंजन विश्वात जोर धरत आहेत. मात्र या चर्चांवर अखेर ऐश्वर्याने स्वतःच प्रतिक्रिया देत क्रिप्टिक पोस्टच्या माध्यमातून ट्रोलर्सना कडाडून सुनावलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असलेल्या चर्चांना कंटाळून ऐश्वर्यानं तिच्या सोशल मीडियावर एका लांबलचक स्टोरीच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. या स्टोरीमध्ये तिनं लिहिलं की, काही लोक तिच्याबद्दल कोणतीही सत्यता न पडताळता मनमानी मतं बनवत आहेत. “मी कोण आहे, काय करते, कुणाशी कसं वागते... हे काहीही न जाणता काही लोक निष्कर्ष काढतात. काही जण माझ्याबद्दल विचित्र कमेंट करतात, ‘कर्मा’ म्हणतात. पण असे बोलण्याआधी माझ्यासोबत काम केलेल्या लोकांना विचारा, को-स्टार्सना विचारा, निर्मात्यांना विचारा. सेटवरच्या कोणालाही विचारा की मी कधी कोणाला दुखावलं आहे का, त्रास दिला आहे का. उत्तर एकच असेल कधीच नाही,” असे ऐश्वर्याने स्पष्ट शब्दांत लिहिले.

आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच तिला ज्या पद्धतीने विनाकारण ट्रोलिंगचा सामना करावा लागला यावरही तिने संताप व्यक्त केला. “ज्या दिवसापासून माझा साखरपुडा झाला, त्या दिवसापासून लोकांनी मला निशाणा बनवलं. मी हे सगळं हलकं घेतलं, हसून टाळलं. पण कोणी कधीच विचारलं नाही की माझ्यासोबत अन्याय होत आहे. यूट्यूब लिंक, मेसेज, कमेंट्स — काही लोकांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे नकारात्मकता ढकलली. मी कुणाला मारलं, कुणाशी गैरवर्तन केलं, असं म्हणणारे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत राहिले. जेव्हा की अशी कोणतीही घटना कधीच घडली नाही,” असं अभिनेत्रीनं नमूद केलं.

ट्रोलर्सना रोखठोक संदेश देताना ऐश्वर्या पुढे म्हणाली, “मी शांत आहे, म्हणून मी चुकीची नाही. आयुष्यात कधी कोणाला त्रास दिलेला नाही. काही लोक आपल्या फायद्यासाठी खोटं पसरवतात आणि त्यांनाच त्यांच्या कर्माचा विचार करायला हवा. मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलणारेच इतरांना अनाठायी टार्गेट करतात, हे दुर्दैवी आहे. मीही शांत राहणाऱ्यांपैकी एक आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी काहीही सहन करीन. माझ्या स्वाभिमानासाठी मी स्वतः उभी राहते.”

सोशल मीडियावर तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी ऐश्वर्याला पाठिंबा दर्शवत तिच्याविरुद्ध पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नाराजी व्यक्त केली आहे. घटस्फोटाच्या अफवांनी तापलेल्या चर्चांमध्ये या पोस्टनंतर आता अभिनेत्रीने दिलेलं हे स्पष्टीकरण विशेष महत्त्वाचं मानलं जात आहे.


---------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने