स्थानिक स्वराज्य निवडणुकांत ‘घराणेशाही’चा उच्चांक; मंत्र्यांचे नातेवाईकच उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर !

मुंबईराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल चांगलाच तापला आहे. अनेक वर्षांनंतर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार, या उत्साहात कार्यकर्ते तळमळीने तयारी करत असतानाच उमेदवारांची यादी समोर आल्यावर नाराजीचा भडका उडाला आहे. कारण, अनेक महत्वाच्या नगरपरिषदांमध्ये सगेसोयरे आणि नातेवाईकांनाच उमेदवारी देण्यात आली असून, स्थानिक कार्यकर्त्यां मध्ये चर्चा रंगू लागली आहे.

पक्षांचे नेते आणि मंत्र्यांनी आपल्या कुटुंबियांना प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांचा तीव्र रोष उफाळून आला आहे. अनेक वर्षे पक्षासाठी सेवा देणाऱ्या लोकांकडून अपेक्षा ठेवूनही यादीत नातेवाईकांची नावे ठळकपणे झळकल्याने, स्थानिक राजकारणात घराणेशाहीचा प्रभाव पुन्हा जाणवून देणारे दृश्य राज्यभर दिसत आहे.

कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?

चिखलदरा नगरपरिषद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केले असून, यंदा ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

जामनेर नगरपरिषद - राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. मंत्री पदाच्या उपभोगानंतर आता घरच्यांनाच संधी देण्यात आल्याने चर्चा रंगली आहे.

खामगाव नगरपरिषद - कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून ‘स्वबळाचा नारा’ असला तरी नातेवाईकांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट चित्र.

पुसद नगरपरिषद - राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी दिल्याने विरोधकांनी कुटुंबीयांना पुढे करणारे राजकारण केल्याची टीका सुरू केली आहे.

फलटण नगरपरिषद - फलटणमध्ये ‘निंबाळकर विरुद्ध निंबाळकर’ अशी परिस्थिती. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत निंबाळकर यांना शिंदे सेनेची उमेदवारी तर पूर्वीचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ समशेरसिंह भाजप उमेदवार

भुसावळ नगरपरिषद - वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरल्या आहेत. अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करत निवडणुकीची रंगत वाढवली आहे.

यवतमाळ नगरपरिषद - आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या कन्या प्रियदर्शिनी वुईके यांना नगराध्यक्षपदाची भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, कुटुंबीयांना उमेदवारी देण्याच्या या मालिकेने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. अनेकांनी वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीवर ‘घराणेशाही’ भारी ठरत असल्याचा आरोप सर्वच पातळ्यांवरून होत आहेत. आगामी निवडणुकीच्या निकालातून जनता या निर्णयांवर शिक्कामोर्तब करते की हिसका देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



  ----------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने