मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. महायुतीतील अंतर्गत नाराजीचे संकेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत होते. अखेर या सर्वांवर शिक्कामोर्तब करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच या नाराजीबद्दल मोठी माहिती उघड केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक घेतली.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची बाब त्यांनी समोर आणली. भाजपातून शिवसेनेत किंवा शिवसेनेतून भाजपात होणारे प्रवेश, स्थानिक समीकरणे ढवळून काढत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी नोंदवली.
आजच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा झाली असून महायुतीतील वातावरण बिघडू नये म्हणून आता सर्व पक्षप्रवेश तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. महायुतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या असल्याने आगामी निवडणुकांपूर्वी कोणत्याही तणावाला वाव मिळू नये, असेही शिंदे म्हणाले.
प्रत्येक पक्षाने आपल्या आचारसंहितेचे पालन करावे आणि महायुतीमध्ये कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या असून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसही आपल्या पदाधिकाऱ्यांना तशीच सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाच्या नेत्यांकडून महायुतीत सर्वकाही सुरळीत असल्याचे विधान सातत्याने करण्यात येत होते; तथापि, आजच्या घडामोडीनंतर शिंदे यांनी स्वतः नाराजीचे मूळ कारण उघड केल्याने महायुतीच्या अंतर्गत धुसफुसीला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणे लक्षात घेता पुढील काही दिवसांत काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
