फेसबुकवर 21 हजार गुंतवा 60 हजार नफा मिळवा अशा दाव्याची जाहिरात !
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या फोटोचा गैरवापर करत एक धक्कादायक साइबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला फेक ऑनलाइन ट्रेडिंग योजनांच्या माध्यमातून तब्बल 1.47 कोटी रुपयांनी लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर विश्वासार्ह वाटावा असा तयार केलेला बनावट जाहिरात मोहिमा, आकर्षक परताव्याचे आश्वासन, प्रसिद्ध व्यक्तींच्या फोटोचा वापर आणि प्रलोभनांच्या आहारी जाण्यासाठी तयार केलेले खोटे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मया सगळ्यांचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली.
फसवणूक एका फेसबुक जाहिरातीपासून सुरू झाली. "फक्त 21 हजार गुंतवा आणि 60 हजारपर्यंत नफा मिळवा" अशा दाव्यांसोबत वित्तमंत्र्यांचा फोटो वापरून ही जाहिरात तयार करण्यात आली होती. यामुळे ही स्कीम अधिकृत आणि सरकारी मान्यताप्राप्त असल्याचा भास निर्माण झाला. पीडिताने त्या जाहिरातीवर क्लिक करताच त्याची माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हातात गेली. त्यानंतर त्याला व्हॉट्सॲपवरून "मीनाक्षी" नावाच्या महिलेकडून कॉल आला. तिने स्वतःला UPSTOX Securities ची प्रतिनिधी म्हणून ओळख करून दिली आणि गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यास भाग पाडले.
त्यानंतर "SBI Wealth Mindset", "Savexa" यांसारख्या फर्जी कंपन्यांत तसेच "Rubicon Research Ltd." या नावाने तयार केलेल्या बनावट IPO मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले. पीडिताने अनेक टप्प्यांत एकूण 1.47 कोटी रुपये विविध खात्यांत जमा केले. या व्यवहारांना वैधतेचा आभास देण्यासाठी ठगांनी फर्जी वर्च्युअल ट्रेडिंग डॅशबोर्ड तयार केला होता, ज्यावर पीडिताला 6.02 कोटी रुपयांपर्यंत नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले. नफा काढण्याचा प्रयत्न करताच स्कॅमरांनी "गारंटी फी" म्हणून आणखी 90 लाखांची मागणी केली. याच क्षणी काहीतरी चुकीचे असल्याचा संशय पीडिताला आला आणि त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
सेंट्रल साइबर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, या फसवणुकीमागे व्यवस्थित रचलेले साइबर फसवणूक रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फर्जी वेबसाइट्स, बनावट ॲप्स, सरकारी व्यक्तींचे फोटो, बनावट प्रतिनिधी, खोटे डॅशबोर्ड या सगळ्यांच्या आधारे लोकांना जाळ्यात ओढले जात असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध वेगाने सुरू असून या प्रकरणाचा तपशीलवार तपास करण्यात येत आहे.
-------------------------------------------
