महापालिका निवडणुका आणि रामबाग मैदानाचा मुद्दा केंद्रस्थानी ; कार्यकर्तेच शक्तिस्थान असल्याचा संदेश !



चंद्रपूर : आगामी चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांची नियोजन बैठक पार पडली असून या बैठकीत तब्बल 440 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या अर्जांनी भाजपची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास अधोरेखित होत असल्याचे मत निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. जैन भवन येथे झालेल्या या बैठकीत शहरातील महत्त्वाच्या रामबाग मैदानाच्या संरक्षणाचा मुद्दाही ठळकपणे उपस्थित राहिला.

या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तिकीट वाटपातही कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारी ही निवडणुकीची एक प्रक्रिया असली तरी खरी शक्ती ही उमेदवारामागे उभी राहणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांत असते. पक्ष निष्ठा, संघटन आणि एकजूट हेच विजयाचे मूळ घटक असल्याचे ते म्हणाले. उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षासाठी निष्ठेने काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा खर्‍या अर्थाने पक्षाची ताकद असल्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. BJP ही व्यक्तिपूजक नव्हे तर विचारपूजक संस्था असून प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील समस्यांसाठी काम करणारा लोकसेवेचा वाहक आहे, असे ते म्हणाले. या बैठकीस पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते, महिला व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील संवेदनशील आणि जनभावनांशी निगडित मुद्दा म्हणून रामबाग मैदानाचे संरक्षण हा विषयही महत्त्वाचा ठरला. जिल्हा परिषद प्रशासनाची नवी इमारत रामबाग मैदानावर उभारण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी सातत्याने विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी बुधवारी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे मैदान कायमस्वरूपी क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली. सुमारे सात एकर क्षेत्रफळाचे हे मैदान चंद्रपूर शहराचे फुफ्फुस मानले जाते आणि दररोज हजारो नागरिक व्यायाम, धावणे, योग, विविध खेळ आणि कार्यक्रमांसाठी या जागेचा वापर करतात. नागरिकांच्या भावनांचा आदर राखत इथे कोणतीही प्रशासकीय इमारत न उभारता मैदानाचे जतन करण्याची विनंती मुख्यमंत्रीसमोर आमदारांनी मांडली असून मुख्यमंत्री यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले आहे.

निवडणूक तयारी आणि शहराच्या विकासाशी निगडित मुद्द्यांमध्ये रामबाग मैदानाचे जतन हा विषय अधिक गती घेऊ लागला आहे. नागरिक, सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी, सांस्कृतिक मंडळे यांच्या संयुक्त पाठिंब्यामुळे ही मागणी आणखी तीव्र झाली असून चंद्रपूरच्या आरोग्य, खेळ संस्कृती आणि सामाजिक जीवनासाठी ही जागा कायम ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करणे आणि शहराच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करणे या दोनही पातळ्यांवर भाजप सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


 ------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने