प्रचंड दडपण माझ्यापासून SIR चे काम होणार नाही असे म्हणत, BLO कर्मचाऱ्याची आठवी आत्महत्या !


गुजरात :  देशातील अनेक राज्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर BLO म्हणून काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या घटना सतत समोर येत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मतदार याद्यांच्या स्पेशल समरी रिव्हिजन SIR प्रक्रियेदरम्यान वाढत्या कामाच्या ताणामुळे BLO कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात येत असल्याचा गंभीर आरोप परिवारांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्यातील कोडिनार तालुक्यातील छारा गावात SIR चे काम करणारे शिक्षक अरविंद वाढेर यांनी कामाच्या प्रचंड दडपणाखाली आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

40 वर्षीय अरविंद वाढेर यांनी आत्महत्येपूर्वी पत्नीला उद्देशून लिहिलेल्या आत्महत्यापत्रात “माझ्यापासून आता SIR चे काम होणार नाही. काही दिवसांपासून खूप थकलो आहे, खूप त्रास होतो आहे. तू आणि आपल्या मुलाची काळजी घे. मला तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण आता मी काहीच करू शकत नाही,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या बॅगमध्ये SIR संबंधित सर्व कागदपत्रे असून ती शाळेत जमा करण्याची सूचना देखील केली. वाढेर यांच्या मृत्यूनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, गुजरात प्रांताने SIR अंतर्गत शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेचा बहिष्कार जाहीर केला आहे.

देशातील BLO कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंचा आलेख चिंताजनक आहे. गुजरातच्या खेड़ा जिल्यात आणखी एका BLO चा मृत्यू झाला असून जलपाईगुडी पश्चिम बंगाल येथे SIR च्या ताणातून एका BLO ने आत्महत्या केल्याची नोंद आहे. राजस्थानात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सवाई माधोपुर येथे एक BLO हृदयविकाराने मरण पावला, तर जयपूरमध्ये 16 नोव्हेंबर रोजी एका सरकारी शिक्षकाने अतिताणामुळे आत्महत्या केली. 

तामिळनाडूच्या कुंभकोणम येथे एका जेष्ठ आंगनवाडी BLO ने कामाच्या वाढत्या ताणामुळे तब्बल 44 गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. केरळच्या कन्नूरमध्ये BLO ने SIR मधील मानसिक दडपणामुळे जीवन संपवले, तर पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्यात 9 नोव्हेंबर रोजी एका BLO चा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी त्यास कामाच्या तणावाशी जोडले आहे.

देशभरातून समोर येणाऱ्या या घटनांनी SIR प्रक्रियेदरम्यान BLO कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या अत्याधिक कामाच्या दडपणाचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. मतदार यादीतील सुधारणांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी नेमण्यात आलेल्या BLO कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून पुरेशी सोय, वेळ आणि मानसिक आधार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आता शिक्षक संघटनांनीही याबाबत शासनाकडे तीव्र भूमिका घेतली असून तातडीने धोरणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.


       --------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने