बिटकॉइनमध्ये सलग घसरण; वर्षभरातील नफ्यात तब्बल ३० टक्क्यांची घट, ट्रम्प धोरणांपासून अनेक घटक कारणीभूत !

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी आणि पहिली क्रिप्टोकरेन्सी मानल्या जाणाऱ्या बिटकॉइनच्या किंमतीत मोठी घसरण सुरूच आहे. गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या सततच्या घसरणीमुळे या वर्षाच्या सुरुवातीपासून गुंतवणूकदारांना मिळालेला सुमारे ३० टक्के नफा पूर्णपणे नाहीसा झाला आहे. एका महिन्यापूर्वी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर रविवारी बिटकॉइनमध्ये १.५९ टक्क्यांची घसरण झाली आणि त्याची किंमत ९३,७१४ डॉलर्सच्या खाली गेली. ही किंमत गेल्या वर्षाच्या अखेरच्या क्लोजिंग प्राइसपेक्षाही कमी आहे.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रिप्टोकरन्सी समर्थक धोरणाबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह ओसरला आहे. त्यासोबत टेक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या मंदीमुळे जोखीम घेण्याची मानसिकता कमी झाली आहे. या वातावरणामुळे बिटकॉइनच्या किमतीवर थेट दबाव आला आहे. ६ ऑक्टोबर रोजी बिटकॉइनने १२६,२५१ डॉलर्सचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता, परंतु ट्रम्प यांच्या अचानक केलेल्या टॅरिफ टिप्पणींनंतर अवघ्या काही दिवसांतच बाजार खाली आला आणि त्यानंतरची घसरण थांबली नाही.

गेल्या महिन्यात ईटीएफ व्यवस्थापक, मोठ्या कंपन्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी बिटकॉइनमधील गुंतवणूक कमी केली आहे. यामुळे सुरुवातीला किंमत वाढण्यास कारणीभूत ठरलेला मजबूत गुंतवणुकीचा प्रवाह कमजोर पडला. बिटकॉइनमध्ये फक्त ईटीएफमार्फतच २५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक आली होती, ज्यामुळे बिटकॉइनची एकूण मालमत्ता १६९ अब्ज डॉलर्सपर्यंत गेली होती. वाढत्या महागाईपासून पोर्टफोलिओ सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात होती, परंतु आता अनेकांनी नफा बुक करणे पसंत केले आहे.

 विश्लेषकांच्या मते, मोठे गुंतवणूकदार पैसे काढत आहेत, दीर्घकालीन गुंतवणूकदार नफा बुक करत आहेत आणि जागतिक आर्थिक परिस्थिती अनिश्‍चित झाल्यामुळे बिटकॉइनच्या किमतीत अचानक आणि सातत्याने घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ घोषणेचा बिटकॉइनच्या किमतीवर मोठा परिणाम झाला होता आणि त्यावेळी ते ७४,४०० डॉलर्सपर्यंत खाली आले होते. त्यानंतर बाजार पुन्हा तेजीत गेला, पण गेल्या महिन्यातील घडामोडींनी पुन्हा घसरणीला चालना दिली.

तरीही बिटकॉइन अद्यापही जागतिक क्रिप्टो मार्केटमधील सुमारे ६० टक्के हिस्सा राखून आहे आणि त्याची एकूण बाजारमूल्य जवळपास ३.२ ट्रिलियन डॉलर्स आहे. मात्र, येत्या काळात जागतिक आर्थिक वातावरण आणि गुंतवणूकदारांची मनोवृत्ती या डिजिटल चलनाच्या भवितव्याचा निर्णायक घटक ठरणार आहेत.


     ----------------------------------------------------------------------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने