सऊदी अरेबिया : उमरा यात्रेहून मक्का ते मदीना जात असलेल्या बसला झालेल्या भीषण अपघाताने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आगीने काही क्षणांत बसला वेढा घातला आणि 45 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वात मोठा आघात तेलंगणातील हैदराबादच्या मुसीराबाद येथील एकााच कुटुंबावर ओढवला आहे. या कुटुंबातील तब्बल 18 सदस्य एका क्षणात राख झाले. तीन पिढ्यांची सलग ओळच संपुष्टात आली. घरी परतण्याच्या आनंदात असताना हृदयद्रावक शांततेपर्यंत हा प्रवास फक्त काही मिनिटांचा ठरला.
शेख नसीरुद्दीन आणि त्यांची पत्नी अख्तर बेगम यांच्यासह त्यांचा मुलगा, दोन मुली, सुना आणि इतर कुटुंबिय ही उमरा यात्रा पूर्ण करून परतत होते. घरच्यांसाठी भेटवस्तू घेतल्या होत्या, मुलांनी नातेवाईकांसाठी खास सामान निवडले होते. पण बसने अचानक डिझेल टॅंकरला दिलेल्या धडकेनंतर सर्व काही क्षणात आगीत भस्मसात झाले. नातेवाईक सांगतात की या यात्रेसाठी सर्वजण अनेक आठवडे तयारी करत होते; त्यांचा आनंद शब्दांत वर्णन करता येणारा नव्हता. आता मात्र त्याच घरात अत्यंत वेदना आणि शांतता दाटून राहिली आहे.
कुटुंबातील मृतांच्या चुलत भावाने रडत रडत सांगितले की, "आमचे 18 लोक… सर्व काही संपलं. आम्हाला संपूर्ण चौकशी हवी आहे. दोषी कोण असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे." त्याच्या प्रत्येक शब्दातून उसळणारा दुःखाचा भडका स्पष्ट जाणवत होता.
या दुर्घटनेत साबिहा बेगम, त्यांचा मुलगा इरफान, सुन हुमैरा आणि त्यांची दोन लहान मुले हामदान आणि इजान ही एकाच कुटुंबाची संपूर्ण शाखा संपली. नातेवाईकांची हळहळ होती की, "बाळं पहिल्यांदाच उमराला गेली होती… किती खुश होती." त्यांच्या आनंदाचे क्षण आगीत विरून गेले.
तेलंगणा स्टेट हज कमिटीचे चेअरमन गुलाम अफजल बियाबानी यांनी या कठीण काळात पीडित कुटुंबांना मदतीचे आश्वासन दिले. प्रायव्हेट ऑपरेटरवर नियंत्रण नसतानाही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, "ही अत्यंत वेदनादायक वेळ आहे. आम्ही सर्व माहिती आणि मदत देऊ. माझ्या मनःपूर्वक संवेदना."
मात्र प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे अखेर या दुर्घटनेला जबाबदार कोण? बसची त्रुटी, प्रायव्हेट ऑपरेटरची निष्काळजीपणा की आणखी काही चूक? मृतांच्या नातेवाईकांचा ठाम आग्रह आहे की, सत्य बाहेर यावे. तपास व्हावा आणि निष्कर्ष जाहीर व्हावा, कारण 18 आयुष्ये आणि त्यांच्या 18 कहाण्या अशा प्रकारे अनुत्तरित प्रश्नांनी संपुष्टात येऊ नयेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
