बबनराव, आठ वेळा ‘बाळंतपण’ झालं पण एक टाका नाही; दानवेंची टोमणेबाजी, वैमनस्य संपल्याची घोषणा

जालना: परतूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजप नेते रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर हे एका व्यासपीठावर आले आणि अनेक वर्षांपासून चालत असलेला त्यांचा राजकीय बेबनाव संपल्याची घोषणा झाली. मात्र सभेत दानवेंनी केलेले मिश्कील वक्तव्य पुढे जाऊन जालन्यातील राजकीय चर्चेचा मुख्य विषय ठरले.

भाजपने परतूर नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे केले असून, प्रचारासाठी रावसाहेब दानवे अनेक वर्षांनंतर प्रथमच लोणीकरांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले. दोन्ही नेते एकत्र आल्याने जिल्ह्यातील भाजपची अंतर्गत वादाची भिंत कोसळल्याचे चित्र निर्माण झाले. पण सभेत दानवेंच्या भाषणाने हशा आणि चर्चा दोन्हीही रंगल्या.

सभेच्या सुरुवातीलाच दानवे लोणीकरांकडे वळाले आणि म्हणाले, “बबनराव, तुमची वेळ आली आहे. आता तुम्ही मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा.”bयानंतर त्यांच्या खास शैलीत त्यांनी लोणीकरांच्या दीर्घ राजकीय प्रवासावर विनोदी टोमणा मारत सभागृहात हास्याची लाट निर्माण केली. “तुम्ही आठ विधानसभेच्या निवडणुका लढलात… आठ वेळा तुमचं ‘बाळंतपण’ झालं, पण एक टाका तरी पडला नाही तुम्हाला!” असं दानवे म्हणताच संपूर्ण उपस्थित कार्यकर्ते खळखळून हसू लागले.

यानंतर दानवेंनी भविष्यातील संभाव्य राजकीय समीकरणांवरही मिश्कील टिप्पणी केली.

ते म्हणाले, “मी तुमच्या पाठीशी आहे. आणि जे नाही त्यांना घेऊन पार्टीला सांगू की बबनराव विधानसभा लढवणार नाहीत. मग त्यांना परभणी लोकसभेची जागा द्या. हरिभाऊ बागडे म्हणाले मी निवडणूक लढवणार नाही… तर त्यांना राज्यपाल केलं. बबनराव, तुम्हाला जर राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा. पार्टीचं काही सांगता येत नाही!”

त्यांच्या या वक्तव्याने सभेत पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, बबनराव लोणीकर यांनीही यानंतरच्या भाषणात दोघांतील तणाव आता पूर्णतः संपल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “आमच्यात आता कोणताही वाद राहिला नाही. आम्ही दोघे मिळून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवू. आगामी निवडणुकांत सर्वाधिक सदस्य भाजपचेच निवडून येतील.”

त्यांच्या या विधानाने जिल्ह्यातील भाजपमध्ये नव्या राजकीय समन्वयाचा संदेश दिला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. परतूरच्या या सभेत, दीर्घकाळ कट्टर समजले गेलेले दानवे आणि लोणीकर एका व्यासपीठावर येणे हेच स्वतःमध्ये मोठी राजकीय घटना ठरली असून, दानवेंच्या मिश्कील वाक्यांनी या सभेची ‘हायलाइट’ बनून जालना जिल्ह्यात नवी राजकीय चर्चा पेटली आहे.


      -----------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने