मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री समोर आली. डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी वरळी बीडीडी चाळ येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे तसेच त्यांच्या बहिणी खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. अवघ्या दहा महिन्यांच्या संसारानंतर गौरी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक चौकशीनुसार, कौटुंबिक वाद, तसेच अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याच्या चर्चांमुळे गौरी मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, सासरकडून होत असलेला छळदेखील गौरी यांनी सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केला आहे. या सर्व दाव्यांची वरळी पोलिस तपासाच्या अनुषंगाने पडताळणी करत आहेत.
घटनास्थळी पोहोचलेल्या वरळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम अहवालातूनच मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे.
गौरी पालवे या केईएम रुग्णालयातील दंत विभागात कार्यरत होत्या. त्यांच्या अकस्मात मृत्यूने सहकारी डॉक्टर आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. लग्नानंतर फक्त दहा महिन्यांत असा निर्णय का घेतला, नेमका कसा कौटुंबिक तणाव होता, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी कुटुंबीयांची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील सर्व अंगांनी तपास सुरू असून, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
------------------------
