डिसेंबर महिन्यात बँका एकूण 18 दिवस बंद राहणार !


मुंबई : डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना असून या महिन्यात बँका एकूण 18 दिवस बंद राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या यादीनुसार समोर आली आहे. विविध राज्यांतील स्थानिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक सण आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळे महिन्याभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बंद असतील. याशिवाय रविवारीची साप्ताहिक सुट्टी आणि दुसरा-चौथा शनिवार मिळून देखील बँकांच्या सुट्ट्यांची संख्या वाढत आहे.

 डिसेंबरमध्ये बँकिंगसंदर्भात कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास या तारखा लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण चेक जमा करणे, डी.डी. तयार करणे, कर्जाची कागदपत्रे पूर्ण करणे किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन कराव्या लागणाऱ्या सेवांवर या सुट्टीचा थेट परिणाम होऊ शकतो.

आरबीआयच्या यादीनुसार डिसेंबर महिन्यात 1 डिसेंबरला अरुणाचल प्रदेशमध्ये इंडिजिनस फेथ डे निमित्त बँका बंद राहतील. 3 डिसेंबरला गोव्यात सेंट फ्रान्सिस झेविअर उत्सव, 12 डिसेंबरला मेघालयमध्ये पा तोगन नेंगमिंजा संगमा दिवस, तर 18 डिसेंबरला छत्तीसगडमध्ये गुरु घासीदास जयंती आणि मेघालयमध्ये यू सोसो थम पुण्यतिथीमुळे बँका बंद राहणार आहेत.

 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवसानिमित्त गोव्यात बँकांना सुट्टी असेल. 24 डिसेंबरला ख्रिसमस ईव निमित्त मेघालय व मिझोरममध्ये सुट्टी जाहीर आहे, तर 25 डिसेंबरला देशातील बहुतांश राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँका बंद राहतील. 

26 डिसेंबरला मेघालय, मिझोरम आणि तेलंगणामध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे सुट्टी जाहीर आहे, तसेच हरियाणामध्ये शहीद उधमसिंह जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. 27 डिसेंबरला हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये गुरु गोविंदसिंह जयंतीनिमित्त सुट्टी असेल. 

30 डिसेंबरला मेघालयमध्ये यू कियांग नांगबाह दिवस आणि सिक्कीममध्ये तामू लोसर निमित्त बँका बंद राहतील. 31 डिसेंबरला मिझोरम आणि मणिपूरमध्ये नववर्ष स्वागतासाठी सुट्टी जाहीर केली आहे.

याशिवाय, डिसेंबरमध्ये 7, 14, 21 आणि 28 डिसेंबरला रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. 13 डिसेंबरला दुसरा शनिवार आणि 27 डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने त्या दिवशीही देशभरातील बँका बंद असतील. त्यामुळे डिसेंबरमध्ये सणांसोबतच साप्ताहिक सुट्टी मिळून अनेक दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे.

बँका बंद असल्या तरी व्यवहारांवर मोठा परिणाम होणार नाही, कारण ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग आणि यूपीआय सेवा या सर्व दिवशी उपलब्ध असतात. ग्राहकांना एटीएममधून रोख रक्कम काढण्याची सुविधा कायम असते आणि बहुतांश बँकांनी स्वतःची मोबाइल ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून दिली असल्यामुळे घरबसल्या पैसे पाठवणे, बिल भरणे, खाते तपासणे किंवा इतर डिजिटल व्यवहार सुरळीतपणे करता येतात. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्यामुळे बँक बंद असली तरी आर्थिक हालचालींमध्ये अडथळा येत नाही, मात्र प्रत्यक्ष शाखेमध्ये कराव्या लागणाऱ्या कामांची पूर्वतयारी ठेवणे आवश्यक आहे.


        ------------------------------






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने