सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाला…
नवी दिल्ली : आशिया कप 2025 ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यातील वाद अधिक चिघळला आहे. ट्रॉफी परत करण्यासंदर्भात बीसीसीआयने एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) प्रमुख मोहसीन नक्वींना पत्र लिहून इशारा दिला होता. मात्र, या पत्राला नक्वी यांनी उद्धटपणे उत्तर देत बीसीसीआयला थेट आव्हान दिलं आहे.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावलं. मात्र, सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनीत भारतीय खेळाडूंनी एसीसी प्रमुख मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नक्वींनी संपूर्ण ट्रॉफी आणि मेडल्ससह मंच सोडला आणि ट्रॉफी घेऊन निघून गेले. त्यानंतर त्यांनी ती ट्रॉफी एसीसीच्या मुख्यालयात लॉक करून ठेवली आहे.
बीसीसीआयने या घटनेबाबत औपचारिक मेलद्वारे एसीसीला कडक इशारा देत ट्रॉफी भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती. बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं की, प्रतिसाद न आल्यास हा मुद्दा आयसीसीच्या बैठकीत नेण्यात येईल.
मात्र, आता नक्वी यांनी कराचीमध्ये मीडियाशी बोलताना उद्दाम उत्तर दिलं आहे.
त्यांनी सांगितलं “आम्ही 10 नोव्हेंबर रोजी दुबई येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्या समारंभात आम्ही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआयचे अधिकारी राजीव शुक्ला आणि संपूर्ण टीम इंडियाला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आमंत्रित करू.”नक्वींच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे.
पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान हुतात्मा झाले होते. त्या घटनेचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी आशिया कपदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने मैदानात उचकावणारे इशारे आणि विधानं केली.
या सर्वाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने ठाम भूमिका घेतली होती की ते मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत आणि त्यांनी तीच कृती फायनलनंतर केली.
नक्वी सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि एसीसीचे प्रमुख असून त्याचबरोबर पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारमधील मंत्री आहेत. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, “भारतीय संघाला ट्रॉफी मी स्वतःच देईन, ती जबाबदारी दुसऱ्या कोणालाही देणार नाही.”
त्यामुळे बीसीसीआयनेही ठाम भूमिका घेतली असून हा मुद्दा आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप 2025 जिंकला, भारतीय संघाने मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी ट्रॉफी घेऊन गेले आणि परत देण्यास टाळाटाळ करत आहे. बीसीसीआयने त्याला पत्राद्वारे इशारा दिला नक्वी म्हणतो , “10 नोव्हेंबर रोजी दुबईत मीच ट्रॉफी देणार”बीसीसीआय हा मुद्दा आता आयसीसीमध्ये नेणार
