पॅरिसच्या ‘लूव्र म्युझियम’मध्ये ७ मिनिटांत ८०० कोटींची चोरी!


‘धूम-२’लाही मागे टाकणारी हाय-टेक चोरी

पॅरिस | हृतिक रोशनचा प्रसिद्ध ‘धूम-२’ चित्रपट आठवतोय ना? म्युझियमच्या आत अनोख्या पद्धतीने चोरी करणारा तो सिनेमॅटिक सीन आता प्रत्यक्षात उतरल्यासारखी घटना फ्रान्सच्या राजधानीत घडली आहे. पॅरिसमधील जगप्रसिद्ध ‘लूव्र म्युझियम’मध्ये अवघ्या ७ मिनिटांत ८०० कोटी रुपयांच्या अमूल्य दागिन्यांची चोरी झाली आहे.

ही घटना शनिवारी सकाळी ९ ते ९.३० या वेळेत घडली, जेव्हा म्युझियममध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती. चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि सिनेमॅटिक पद्धतीनं चोरी केली. हायड्रॉलिक ट्रक, शिडी आणि बॅटरी कटर यांच्या मदतीनं त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून म्युझियममध्ये प्रवेश केला. आत शिरल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांना धमकावून काही मिनिटांतच सर्व अमूल्य दागिने बॅगमध्ये भरले आणि खिडकीतून खाली उतरून स्कूटरवरून फरार झाले.

संपूर्ण चोरी केवळ ७ मिनिटांत पार पडली. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनाही कल्पना यायच्या आत चोर गायब झाले. या कारवाईत चोरांनी ट्रकऐवजी स्कूटर वापरली, जेणेकरून पॅरिसच्या अरुंद गल्ल्यांमधून ते सहजपणे पसार होऊ शकतील.

फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयानं चोरीची पुष्टी केली आहे. १९व्या शतकातील आठ अमूल्य दागिने चोरीला गेले असून ते फ्रान्सच्या शाही कुटुंबाशी संबंधित आहेत.

चोरांनी घेतलेली वस्तूंत सम्राट नेपोलियन तिसऱ्याची पत्नी महाराणी यूजीनचा मुकुट आणि ब्रोच, महाराणी लुईजचा पाचूचा हार आणि बाळ्या, महाराणी मेरी-अमेली आणि हार्तेंस यांचे नीलम जडित मुकुट, हार आणि बाळ्या, एक रिक्ल्वेरी ब्रोच, ज्यामध्ये दुर्मिळ रत्नांचा वापर करण्यात आला होता.

या दागिन्यांतील काही नेकलेसमध्ये २,००० पर्यंत हिरे जडवलेले होते. एकूण किंमत सुमारे ८.८ कोटी युरो म्हणजेच जवळपास ८०० कोटी रुपये असल्याचे अंदाज आहे. घटनास्थळी दोन मौल्यवान वस्तू पडलेल्या अवस्थेत सापडल्या, ज्यांना चोर घेऊन जाण्यात अपयशी ठरले.

लूव्र म्युझियम हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि संरक्षित म्युझियमपैकी एक असलं तरी चोरीच्या घटनांसाठी ते पूर्वीपासून बदनाम राहिलं आहे. १९११ मध्ये, इथून लिओनार्डो दा विंची यांचं ‘मोनालिसा’ चित्र चोरीला गेलं होतं. १९८३ मध्ये, १६व्या शतकातील एक चिलखत चोरीला गेलं, जे २०११ मध्ये सापडलं. १९९८ मध्ये, कलाकार कॅमील कोरो यांचं प्रसिद्ध पेंटिंग ‘द सेव्र रोड’ चोरीला गेलं आणि ते अद्याप सापडलेलं नाही.

याशिवाय गेल्या काही वर्षांत फ्रान्समधील इतर म्युझियममध्येही वारंवार चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यातच ‘एड्रियन डुबूशे म्युझियम’मधून ९५ लाख युरो (सुमारे ९० कोटी रुपये) किमतीच्या कलाकृती चोरीला गेल्या, तर कॉन्‍याक जे म्युझियम’ आणि ‘हीरॉन म्युझियम’ मधूनही करोडो रुपयांच्या ऐतिहासिक वस्तू लुटल्या गेल्या होत्या.

फ्रेंच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपासात ही चोरी ‘हाय-टेक प्रोफेशनल गँग’ कडून करण्यात आली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने