ऐन दिवाळीत मुसळधार पाऊस! मुंबईसह राज्याच्या विविध भागात हजेरी,

                                                  

दिवाळीत अवकाळी सावट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : दिवाळीच्या आनंदात पावसाने व्यत्यय आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आज पुन्हा राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पावसाने नागरिकांना अक्षरशः धास्तावले आहेत. 

पश्चिम उपनगरात  जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले या भागांत धारदार सरींचा जोर पाहायला मिळतो आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ४० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी उन्हाचे चटके बसल्यानंतर सायंकाळी मुसळधार सरी कोसळल्या. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला असून, शहरातील काही भागांत पाणी साचल्याची माहिती मिळते आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. पैठण आणि वैजापूर तालुक्यात दुपारनंतर जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागांमध्ये हा पाऊस आणखी नुकसानकारक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली असून, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. कल्याण–डोंबिवली–अंबरनाथ–बदलापूर या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जना होत आहेत. कल्याणमधील अनुपमनगर येथे झाड कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.

दिवाळीच्या सणात हा अवकाळी पाऊस नागरिकांसाठी अनपेक्षित ठरला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने