ईमानदारीचे रखवाले झाले ‘शौकपाल’!


 BMW कार खरेदीवरून देशभरात वादंग

नवी दिल्ली : भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या लोकपाल संस्थेने तब्बल सात लक्झरी BMW कार खरेदीसाठी टेंडर काढल्याने देशभरात राजकीय वाद निर्माण झाला आहे. अंदाजे पाच कोटी रुपयांच्या या कार खरेदीवर आता विरोधकांनी तीव्र टीका करत ‘लोकपाल आता शौकपाल झाले’ असा टोला लगावला आहे.

लोकपाल संस्था म्हणजे देशातील प्रामाणिकतेचे प्रतीक मानली जाते. पण आता सात आलिशान BMW कार खरेदीसाठी काढलेले टेंडर समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर तसेच लोकपाल कार्यालयावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “ज्यांनी मनमोहन सिंग सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराचं खोटं  पसरवलं, त्यांनी आता लोकपालची खरी ‘लक्झरी’ पाहावी.”

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सवाल केला, “जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश साध्या गाड्यांचा वापर करतात, तेव्हा लोकपालला BMW का हवी?”

काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी उपरोधिक टीका करत ट्विट केलं, “८७०३ तक्रारी, फक्त २४ चौकशा, ६ अभियोजन परवानग्या आणि आता BMW… ही संस्था ‘पँथर’ नाही, ‘पूडल’ झाली आहे.”

दरम्यान, टीएमसी खासदार साकेत गोखले यांनी आकडेवारी सादर करत म्हटलं, “लोकपालचं वार्षिक बजेट ४४.३२ कोटी आहे, त्यातील १० टक्के फक्त गाड्यांवर खर्च केला जाणार आहे!”

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं, “देशी वस्तूंचं गोड गाणं गाणार सरकार आता विदेशी गाड्यांच्या मागे लागली आहे का?”

या टेंडरनुसार विक्रेत्याने कारसोबत ७ दिवसांची मोफत प्रशिक्षण सेवा (Training) देणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणात ड्रायव्हरांना कारचे सर्व फीचर्स, सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य शिकवले जाणार आहे.

हे प्रशिक्षण कार डिलिव्हरीनंतर १५ दिवसांच्या आत पूर्ण करावे लागेल. टेंडरमध्ये बोली सादर करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर आहे. तसेच बोली लावणाऱ्या एजन्सींना १० लाख रुपयांची जामीनरक्कम (EMD) जमा करावी लागेल.

डिलिव्हरी ऑर्डर मिळाल्यानंतर १४ ते ३० दिवसांच्या आत गाड्या पुरवाव्या लागतील, असेही या अटींमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

या घडामोडीनंतर विरोधकांनी लोकपाल संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “ईमानदारीच्या रक्षकांनी आता ऐशोआरामाची वाट धरली आहे” असा आरोप केला आहे.

 

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने