महायुतीचा फॉर्म्युला, ठाण्यातील निर्णय निर्णायक
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात मोठ्या नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असून, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या पेचात सापडले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “जिथे विरोधकांना फायदा होईल, तिथे महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत.”
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) मिळून लढवली जाणार आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
या निर्णयानंतर राज्यातील सत्तारूढ आघाडीने स्पष्ट संदेश दिला आहे की, विरोधकांना कोणत्याही पातळीवर संधी देण्यात येणार नाही. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक राजकीय परिणाम ठाणे महानगरपालिकेत दिसून येऊ शकतो.
प्राप्त माहितीनुसार, ठाण्यातील युतीबाबतचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. मात्र, युती झाल्यास जागा वाटपाच्या वेळी भाजपला ठाण्यातील काही महत्त्वाच्या जागा मिळाल्यास शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
कारण, शिंदे गटातून उमेदवारीची अपेक्षा ठेवणारे अनेक कार्यकर्ते जर बाजूला पडले, तर ते पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळेच ठाणे महानगरपालिकेतील युतीचा निर्णय हा शिंदे गटासाठी राजकीय कसोटी ठरणार आहे. युती करायची की स्वबळावर लढायचं हा निर्णयच शिंदे यांच्या भवितव्याला दिशा देणारा ठरू शकतो.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील काही नेत्यांनी देखील स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीतील एकोपा बाबतही राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला आहे. विरोधकांचा दावा आहे की, सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत स्पर्धेमुळे महायुतीत गोंधळ निर्माण झाला आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या मते, ही सर्व चर्चा विरोधकांच्या मनोबलावर घाव घालण्यासाठीची राजकीय रणनीती आहे.
आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नाकडे लागल्या आहेत
एकनाथ शिंदे ठाण्यात महायुती म्हणून लढणार का स्वबळावर? हा निर्णयच राज्याच्या आगामी राजकीय समीकरणाला निर्णायक वळण देईल, यात शंका नाही अशी चर्चा सुरू आहे
#महायुती, #एकनाथ शिंदे, #देवेंद्र फडणवीस, #ठाणे महानगरपालिका, #स्थानिक स्वराज्य निवडणुका, #महाराष्ट्र राजकारण, #शिवसेना शिंदे गट, #भाजप, #राष्ट्रवादी अजित पवार गट, #महापालिका निवडणुका, #मुंबई महानगरपालिका, #महायुतीचा फॉर्म्युला, #युतीचा पेच, #शिंदे गट, #ठाण्यातील राजकारण, #महाराष्ट्र निवडणुका 2025, #सत्तासंघर्ष, #भाजप-शिवसेना युती, #स्वबळाचा नारा, #राजकीय घडामोडी
-