छाप्यात सापडले अणुबॉम्ब डिझाइनचे 14 गुप्त नकाशे
मुंबई : देशाच्या सुरक्षेला हादरा देणारी घटना मुंबईत उघडकीस आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा (BARC) शास्त्रज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या बनावट व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात अणुबॉम्ब डिझाइनचे 14 अत्यंत संवेदनशील नकाशे, काही गोपनीय कागदपत्रे आणि बनावट BARC ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्था (NIA), गुप्तचर विभाग (IB) आणि मुंबई गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अख्तर हुसेनला ताब्यात घेतले. त्याच्या वर्सोवा येथील फ्लॅटवर धाड टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्कादायक पुरावे सापडले. तपासादरम्यान अणुबॉम्बच्या बनावटीशी आणि डिझाइनशी संबंधित १४ गुप्त नकाशे आणि महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. ही सर्व कागदपत्रे देशाच्या अणुसुरक्षेसाठी अत्यंत गोपनीय मानली जातात.
अधिकाऱ्यांनी छाप्यात ‘अली रझा होसेनी’ या नावाचे बनावट BARC ओळखपत्र देखील जप्त केले. या ओळखपत्रावर अख्तरचा फोटो लावलेला होता. आता तपास सुरू आहे की, या कार्डच्या आधारे आरोपीने BARC च्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून संवेदनशील माहिती किंवा चित्रे मिळवली होती का?
तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे आरोपीने ज्या नकाशांचे प्रिंट घेतले होते, त्यापैकी काही अंधेरीतील स्थानिक दुकानातून छापण्यात आले होते. हे नकाशे नेमके कुठून मिळवले आणि त्यामागे कोणते जाळे आहे, याचा तपास सुरू आहे.
अख्तर हुसेनच्या फ्लॅटमधून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देखील सापडले आहेत. त्याच्यासोबत राहणाऱ्या पत्नी आणि मुलाचा या प्रकरणात काही सहभाग आहे का, हेही तपासले जात आहे.
सध्या जप्त केलेले मोबाइल फोन, पेन ड्राइव्ह आणि इतर डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. या उपकरणांतून आरोपीच्या संपर्कांचे आणि कारवायांचे ठसे मिळू शकतात, असा अंदाज आहे.
या प्रकरणात NIA, IB आणि मुंबई पोलिसांची संयुक्त चौकशी सुरू असून, अख्तर हुसेनचा आंतरराष्ट्रीय किंवा दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहे का, तो कोणाच्या सांगण्यावरून भारतातील गोपनीय माहिती मिळवत होता का, याचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेमुळे देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या यंत्रणांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय अँगल तपासत असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
#मुंबई, #अणुबॉम्ब नकाशे, #BARC, #अख्तर हुसेन, #बनावट शास्त्रज्ञ, #राष्ट्रीय सुरक्षा, #NIA, #IB, #फॉरेन्सिक तपास, #गुप्तचर विभाग, #भारत अणुसुरक्षा.#Mumbai, #atomic bomb maps, #BARC, Akhtar Hussain, #fake scientist, #national security, #NIA, #forensic investigation, #intelligence department, #India nuclear security.