बलुचिस्तानला स्वतंत्र ओळख दिल्यामुळे संताप
रियाध (सौदी अरेबिया) : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'जॉय फोरम 2025' या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान दिलेल्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तान सरकार संतप्त झालं असून, सलमान खानला दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे.
सौदी अरेबियाच्या राजधानी रियाधमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सलमान खानसोबत शाहरुख खान आणि आमिर खानही उपस्थित होते. या कार्यक्रमात मध्यपूर्व देशांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव आणि दक्षिण आशियाई समुदायाच्या कामगिरीवर चर्चा झाली.
कार्यक्रमादरम्यान सलमान खान म्हणाला “सौदी अरेबियामध्ये बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसह अनेक ठिकाणांहून आलेले लोक मेहनत करून आपले भविष्य घडवत आहेत.”
याच विधानातील ‘बलुचिस्तान’ला पाकिस्तानपासून वेगळं दाखवणारा सूर पाकिस्तानला चांगला न पटल्याने तिथल्या सरकारकडून सलमानविरोधात तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सलमान खानवर देशविरोधी वक्तव्याचा आरोप करत त्याला “दहशतवादी प्रवृत्तीचा कलाकार” म्हटले आहे.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असला, तरी तेथील जनतेमध्ये स्वतंत्र बलुच राष्ट्राच्या मागणीसाठी चाललेलं आंदोलन दशकानुदशकं सुरू आहे. सलमान खानच्या वक्तव्याने जणू या मागणीला अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाल्याचा अर्थ पाकिस्तानने घेतला आहे.
दरम्यान, भारतात आणि अरब देशांमध्ये सलमान खानच्या वक्तव्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सलमानच्या वक्तव्याला “सत्य बोलण्याचं धाडस” म्हटलं आहे, तर काहींनी त्याला “अनावश्यक राजकीय टिप्पणी” म्हणत टीका केली आहे.
सध्या या प्रकरणाने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. समाज माध्यमावर #SalmanKhan आणि #Balochistan हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत. पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर भारतीय चाहत्यांनी सलमानच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली आहे.
