Gold Silver Price :सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरू!


वर्षभरात चांदीचा भाव 70 हजारांनी वाढला; सोन्यालाही दरवाढीची झळ



देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरूच असून दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. जागतिक अस्थिरता, रशिया-युक्रेन युद्ध आणि जिओ-पॉलिटिकल तणाव यामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.


 बाजारात आज चांदीचा दर किलोमागे 1 लाख 55 हजार 500 रुपये इतका झाला आहे. एका वर्षात चांदीच्या भावात तब्बल 70 हजार रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत हा दर 1 लाख 70 हजार रुपये प्रति किलो इतका पोहोचू शकतो, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरवाढ असूनही चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत असून जुनी चांदी विकून अनेक जण नफा कमावत आहेत.


प्रति किलो चांदी दरवाढीचा आलेख 

7 ऑक्टोबर 2024 – ₹88,000

1 मार्च 2025 – ₹1,01,000

1 जून 2025 – ₹1,10,000

1 सप्टेंबर 2025 – ₹1,40,000

6 ऑक्टोबर 2025 – ₹1,55,500

दर वाढल्याने सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या तोंडावर अनेकांचे बजेट कोलमडले आहे. 

दरम्यान, सोन्याच्या दरातही गेल्या 24 तासांत तब्बल ₹1,500 ची वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा दर जीएसटीशिवाय ₹1,20,000 आणि जीएसटीसह ₹1,23,800 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.


रशिया-युक्रेन आणि इस्रायल-गाझा युद्ध, अमेरिकेतील आर्थिक अस्थिरता, तसेच अनेक देशांच्या सेंट्रल बँकांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील सुवर्ण खरेदी या सगळ्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दराने दरवाढीचे सर्व उच्चांक मोडले आहेत.


दिवाळी आणि लगीनसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या या झपाट्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यांतही या दरवाढीचा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने