नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

                                                  





पहिला टप्पा पूर्ण, डिसेंबरपासून प्रवासी सेवा 


नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दी. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते.


मोदींनी उद्घाटनापूर्वी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला आणि टर्मिनल-1 व रनवे-1 चं काम पूर्ण झाल्याची माहिती घेतल्यानंतर उद्घाटन केलं. हा विमानतळ पूर्णपणे चार टप्प्यांमध्ये उभारला जाणार असून, पहिला टप्पा आता कार्यान्वित झाला आहे. विमानतळावरून प्रवासी आणि कार्गो सेवा दोन महिन्यांनंतर, म्हणजेच डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी तब्बल 7 वर्षांचा कालावधी लागला आहे. विमानतळ प्रकल्पाची उभारणी अदानी समूह आणि सिडको  यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली असून, अदानी समूहाकडे 74 टक्के मालकी, तर सिडकोकडे 26 टक्के मालकी आहे. अदानी समूहाने 2021 साली विमानतळ प्रकल्पात अधिकृतरीत्या प्रवेश केला.


हा विमानतळ मुंबईनजीकचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा दुसरा विमानतळ ठरणार आहे. 2018 मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर जमीन अधिग्रहण आणि बांधकाम ही मोठी आव्हानं होती, मात्र ती सर्व पार करत आज पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.


नवी मुंबई विमानतळावर एकूण चार टर्मिनल्स आणि दोन रनवे असतील. पहिल्या टप्प्यातील टर्मिनलचे उद्घाटन पूर्ण झाल्यानंतर आता पुढील टप्प्याचं काम वेगाने सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळामुळे मुंबईतील गर्दी कमी होऊन देश-विदेशातील प्रवाशांना नवी सुविधा उपलब्ध होणार आहे. 


# Navi Mumbai Airport#Passenger services#Narendra Modi#Devendra Fadnavis                  #आंतरराष्ट्रीय विमानतळ#पंतप्रधान नरेंद्र मोदी#देवेंद्र फडणवीस#दि बा पाटील


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने