आयुर्वेदाचा उत्सव की केवळ खरेदीचा दिवस?


 जाणून घेऊया ‘धनतेरस’चा खरा अर्थ !


धनतेरस म्हणजे केवळ सोने–चांदी, भांडी किंवा वस्तू खरेदी करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक शुद्धीचा प्रतीक. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. 


विशेष म्हणजे धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात आणि ते अमृत कलशासह प्रकट झाले होते, त्यामुळे हा दिवस आरोग्य आणि आयुष्याच्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद देणारा मानला जातो


संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध सूक्ति आहे.

“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्” म्हणजे शरीर हेच सर्व धर्माचं साधन आहे. एका श्लोकात असंही म्हटलंय,


 “धन गेलं तर काहीच गेलं नाही, आरोग्य गेलं तर अर्धं धन गेलं, पण धर्म आणि चरित्र गेलं तर सर्व काही गेलं


यातून स्पष्ट होतं की खरं धन म्हणजे आरोग्य, सदाचार आणि मानसिक शुद्धता, केवळ पैसा नव्हे.


धनतेरस हा आयुर्वेद आणि आरोग्याचा उत्सव मानला जातो. पुराणानुसार, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले, आणि त्यांनी मानवजातीला आयुर्वेदाचे ज्ञान दिले. त्यामुळे धनतेरस या दिवसाला ‘धन्वंतरी त्रयोदशी’ असेही म्हणतात.


धनतेरसपासूनच दिवाळीचा उत्सव सुरू होतो.

हा दिवस केवळ बाह्य संपत्ती मिळविण्याचा नसून मन, विचार आणि शरीराच्या शुद्धीचा दिवस आहे. देवी लक्ष्मी समृद्धीचं प्रतीक आहे, कुबेर धनाचे अधिपती आहेत आणि धन्वंतरी आरोग्याचे रक्षक आहेत या तिघांच्या एकत्र पूजनाने समृद्ध जीवनाचा पाया तयार होतो.


तमिळनाडू आणि दक्षिण भारतात, धन्वंतरी त्रयोदशीच्या दिवशी स्त्रिया “मरुंधु” नावाची आयुर्वेदिक औषधी तयार करतात. दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशीच्या सकाळी, सूर्योदयाआधी हे औषध प्रसाद म्हणून घेतले जाते. ही परंपरा आरोग्यसंपन्न जीवनाचा संदेश देणारी आहे.


एकूणच, धनतेरस हा केवळ खरेदीचा सण नसून आयुर्वेद, आरोग्य, समृद्धी आणि अध्यात्मिक जागृतीचा उत्सव आहे. बाहेरील प्रकाशाइतकाच हा दिवस अंतर्मनातील उजेड आणि शुद्धतेचा संदेश देतो.







Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने