दांपत्याची रक्कम विविध १८ खात्यांमध्ये ट्रान्सफर
मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाला आणि त्यांच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करून तब्बल ५८ कोटी रुपयांची सायबर ठगी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठगांनी स्वतःला ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) अधिकारी भासवत, दाम्पत्याकडून व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे ही फसवणूक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ठगांनी आपली ओळख ‘सुब्रह्मण्यम’ आणि ‘करण शर्मा’ अशी सांगितली. त्यांनी खोटी सरकारी ओळखपत्रे आणि दस्तऐवज दाखवून स्वतःला केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर व्यवसायिकावर मनी लॉन्ड्रिंग तपास सुरू असल्याचे सांगून “पैसे द्या नाहीतर अटक करू” अशी धमकी दिली.
भीतीच्या वातावरणात अडकलेल्या दाम्पत्याने दोन महिन्यांच्या कालावधीत १८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ५८.१३ कोटी रुपये ट्रान्सफर केले. प्रत्येक खात्यात सुमारे २५-२५ लाख रुपये जमा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार आतापर्यंतच्या ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर फसवणुकीतील सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ठगांनी १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबरदरम्यान आरटीजीएस (RTGS) प्रणालीद्वारे पैसे मिळवले. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आता सर्व बँक खात्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे अब्दुल खुल्ली (४७) अर्जुन कडवसारा (५५) जेताराम कडवसारा (३५) अशी आहेत
व्यवसायिकाला जेव्हा ५८ कोटी रुपये गमावल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत (IT Act) गुन्हा नोंदवला आहे. तपासादरम्यान वित्तीय व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत असून, अनेक बँक खात्यांतील रक्कम गोठवण्यात आली आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. सरकारी अधिकारी, ईडी किंवा सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्यांची ओळख नेहमी पडताळा. कोणत्याही परिस्थितीत पैसे ट्रान्सफर करू नका किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
