Breaking

Post Top Ad

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

India Britain Agreement : ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे भारतात कॅम्पस!

                                                          


एफटीए करारामुळे एमएसएमईंना नवा बूस्ट - पंतप्रधान मोदी


मुंबई : भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मोठा फायदा होणार असून, हजारो युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या ‘इंडिया-यूके सीईओ फोरम’ मध्ये ते बोलत होते.


मोदींनी यावेळी जाहीर केले की ब्रिटनमधील नऊ विद्यापीठे भारतात आपले कॅम्पस सुरू करणार आहेत. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात नवी ऊर्जा येईल आणि उद्योग-शिक्षणातील संबंध अधिक मजबूत होतील.


पंतप्रधान म्हणाले, “सध्या भारत-यूके व्यापार सुमारे ५६ अब्ज डॉलर आहे. आपण तो २०३० पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मला विश्वास आहे की हे उद्दिष्ट वेळेपूर्वीच पूर्ण होईल.”


त्यांनी सांगितले की एफटीए करारामुळे दोन्ही देशांच्या एमएसएमई क्षेत्राला बळकटी मिळेल आणि लाखो लोकांना रोजगार मिळेल. तसेच तंत्रज्ञान, शिक्षण, नवोपक्रम, पायाभूत सुविधा आणि औषध उद्योग अशा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची संधीही मिळेल.


“भारत आज स्थिर धोरणे, पारदर्शक नियम आणि मोठी बाजारपेठ असलेला देश आहे. गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे,” असे मोदी म्हणाले.


फिनटेक क्षेत्रातील भारताची कामगिरी सांगताना त्यांनी नमूद केले की, जगातील जवळपास ५० टक्के डिजिटल व्यवहार भारतात होतात. ब्रिटनचा अनुभव आणि भारताचा डिजिटल पायाभूत आराखडा एकत्र आला, तर दोन्ही देशांच्या प्रगतीला नवे पंख मिळतील, असे त्यांनी सांगितले.


#पंतप्रधानमोदी #भारतब्रिटनकरार #एफटीए #MSME #ब्रिटनविद्यापीठे #आंतरराष्ट्रीयव्यापार #शिक्षणक्षेत्र #भारताचाविकास



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad