मिस्टर ट्रम्प, ' भारतासोबतचे संबंध त्वरित सुधारा’!




भडकलेल्या 19 खासदारांचा अमेरिकन अध्यक्षांवर ‘लेटर बॉम्ब’


न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतावर लादलेले टॅरिफ मागे घ्यावे, अशी मागणी अमेरिकेतील 19 खासदारांनी केली आहे. या खासदारांनी ट्रम्प यांना थेट पत्र लिहून भारताशी असलेले संबंध बिघडवू नका, तर उलट ते त्वरित सुधारावेत, असे स्पष्ट आवाहन केले आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले आहे. याशिवाय, अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या औषधांवर आणि चित्रपटांवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू करण्यात आले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय औषध उत्पादक कंपन्या आणि मनोरंजन उद्योगावर झाला आहे.


त्याचबरोबर, एच-१बी व्हिसाचे शुल्क तब्बल १ लाख डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आले, ज्यामुळे भारतीय आयटी व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे.


या विरोधाचं नेतृत्त्व खासदार डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांनी केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 19 खासदारांनी ८ ऑक्टोबर रोजी ट्रम्प यांना पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “टॅरिफ धोरणांमुळे भारतासोबतचे संबंध ताणले गेले आहेत, आणि त्याचा नकारात्मक परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे हे टॅरिफ तातडीने मागे घेतले पाहिजे.”


खासदारांनी आपल्या पत्रात नमूद केले की, ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर २५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवले. त्यासोबतच रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अजून २५ टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लादले आहे.


या वाढीमुळे भारतीय उत्पादक आणि अमेरिकन ग्राहक दोघांचेही नुकसान होत आहे, तसेच सप्लाय चेनवर गंभीर परिणाम होत आहेत. “अमेरिकेतील अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनासाठी भारतातील घटकांवर अवलंबून आहेत,” असे खासदारांनी निदर्शनास आणून दिले आहे.


खासदारांनी पत्रात म्हटले की, “भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. सेमीकंडक्टर, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात भारताची भूमिका निर्णायक आहे.” त्यांनी हेही नमूद केले की, भारतात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळतो, तर भारतातील गुंतवणूकदार अमेरिकेत रोजगारनिर्मिती करत आहेत.


खासदारांनी इशारा दिला की, जर ट्रम्प प्रशासनाने हे टॅरिफ मागे घेतले नाहीत, तर भारत चीन आणि रशिया यांच्याकडे झुकू शकतो. यामुळे अमेरिकेचे धोरणात्मक नुकसान होईल आणि क्वाडसारख्या आंतरराष्ट्रीय भागीदारीवर परिणाम होऊ शकतो.


त्यांनी असेही नमूद केले की, वाढत्या टॅरिफमुळे अमेरिकन कुटुंबांचा खर्च वाढेल आणि अमेरिकन उद्योगांची जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता कमी होईल.


 #DonaldTrump #IndiaUSRelations #TradeTariff #RoKhanna #DeborahRoss #USCongress #IndiaUSPartnership #BreakingNews #WorldNews #TariffWar




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने