Breaking

Post Top Ad

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे जूनपर्यंत पूर्ण करा;मंत्री संदिपान भूमरे

मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे जूनपर्यंत पूर्ण करा;मंत्री संदिपान भूमरे
महाराष्ट्र24 | यवतमाळ : शेतमाल बाजारात पोहविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामाला गती देऊन मंजूर पाणंद रस्ते १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी आज अमरावती येथे दिले.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे जूनपर्यंत पूर्ण करा;मंत्री संदिपान भूमरे
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन देणे व ज्या गावात रोहयोंच्या कामांवर मजूरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यक काम हाती घेण्यात यावे, जेणेकरुन मजूरांना रोजगार मिळेल व रोजगारामुळे मजूरांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचे मंत्री भूमरे यावेळी म्हणाले.


संपूर्ण राज्यात प्रत्येक पंचायत समितीत रोजगार सेवकाला कामकाजासाठी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मातोश्री भवन स्थापन करण्यात येईल. राज्यात एक लाखांवर रस्त्यांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्यावर भर द्या. याशिवाय शाळेची कुंपण भिंत, स्मशानभूमी अशा कामांसाठीही रोहयोच्या मजूरांची मदत घ्या. मातोश्री पाणंद रस्ते हा केवळ शेतकऱ्यांसाठी नसून संपूर्ण गावकऱ्यांना याचा फायदा होतो. यासाठी पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्वक करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad