भव्य मशाल रॅलीतून शेतकऱ्यांचा मोदी सरकारला निर्वाणीचा इशारा
यवतमाळ : भाजप प्रणित केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी केलेल्या काळ्या कायद्याविरोधातली धग आज यवतमाळ येथे मशाल रॅलीतून जाणवली. मशाली पेटवून शेतकऱ्यांनी या कायद्याविरोधात आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांना गुलामीत लोटणारे जुलमी कायदे रद्द करा अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा सज्जड इशारा शेतकऱ्यांनी या आंदोलनातून केंद्र सरकारला दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
आझाद मैदानातील जयस्तंभापासून मशाल रॅलीला सुरुवात झाली. संविधान चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत १०५ मशालींसह हि रॅली काढण्यात आली.
या रॅली मध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर, चंद्रकांत चौधरी, अशोक भुतडा, जावेद अन्सारी, शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे, विठ्ठल आडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीमध्ये सहभागी शेतकऱ्यांनी सरकार विषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यवतमाळ येथे प्रथमच शेतकऱ्यांचे असे अभिनव व उग्र आंदोलन झाले.मशालींच्या ज्वाळांप्रमाणे शेतकऱ्यांचा रोष देखील धगधगत होता. या आंदोलनात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response