Breaking

Post Top Ad

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

अन् जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जीएमसीच्या डाॅक्टरांची झाडाझडती

अन् जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जीएमसीच्या डाॅक्टरांची झाडाझडती

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातच मृत्युंचा आकडाही दिवसेंदिवस फुगत चालला आहे. प्रत्येक दिवशी सरासरी पाच कोरोनाबाधित रुग्ण दगावत आहे. या बाबीची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांची चांगलीच झाडाझडती घेतली.


जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या १५ ते २० डॉक्टरांना स्वत:च्या कॅबिनमध्ये पाचारण केले. यापूर्वीसुध्दा अनेकदा समज देऊनही मृत्यूच्या आकडा कमी करण्यासाठी डॉक्टरांना सांगण्यात आले होते. त्यातच वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक डॉक्टर खाजगीरित्या रुग्णसेवा करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह यांना वारंवार प्रशासनाने सूचना केल्या होत्या. मात्र या सूचनांकडे अधिष्ठातांसह डॉक्टरांनी दुर्लक्ष करून आपली खाजगी दवाखाने थाटात सूरू ठेवली.


आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या. किती वेळा कोव्हीड वॉर्डात डॉक्टरांनी भेटी दिल्या याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांकडे विचारणा केली असता डॉक्टरांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे रोस्टर तीन–तीन महिन्यांपासून अपूर्णावस्थेत असल्याचे आढळले. एवढेच नाही तर रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू का होत आहे, असे विचारल्यावर डॉक्टरांकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते.


त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत डॉक्टरांना तंबी दिली. तसेच खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना त्वरीत शाॅकेज नोटीस देण्याचे निर्देश अधिष्ठाता आर. पी. सिंह यांना दिले. वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार देणे हे डॉक्टरांचे प्राथमिक कर्तव्य आहे. यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात कोव्हीड, नॉन कोव्हीड रुग्णांवर योग्य उपचार करावे. तसेच मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्वत:च्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासकीय कारवाई करण्यास बाध्य करू नका, असा सज्जड दमही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad