गरज नसतांना कोरोनाची दहशत निर्माण करण्यात आली आहे. अशातच शासन अंमलात आणत असलेल्या काही उरफाट्या नियमांमुळे नागरीक मात्र वैतागले आहे. त्यामुळे अशा नियमांबाबत शासनाने फेरविचार करावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
नेताजी चौक परीसरातील एक तरुण कोरोना बाधीत आढळून आल्याने त्याला कॉरेन्टाईन करण्यात आले होते. या ठिकाणी आनखी कोरोना पसरु नये म्हणून प्रशासनाने नेताजी चौक, बसस्थानक परीसर तसेच संत सेना चौका पर्यन्त परीसर 28 दिवसांकरीता सिल केला आहे. नेताजी चौक परीसरात सर्व छोटे व्यावसाईक आपला व्यवसाय करतात. गेल्या तीन महिण्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे हे व्यावसाईक डबघाईस आले आहे. अशातच आता 28 दिवसांकरीता परीसर सिल करुन टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणाला कोरोनाची लागण झाली त्याने आयसोलेशन वार्डातून व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला. त्याला फारच सौम्य असे लक्षण आढळून आले. दोन दिवसात घरी परत येतो, चिंता करु नका. थोडीशी घशात खरखर आहे असे त्याने व्हिडीओ मध्ये सांगीतले. या तरुणाला कोरोनाचे काहीच लक्षण नसल्यामुळे त्याला आता सुट्टी सुध्दा झाली मात्र संपुर्ण परीसर बंद करुन टाकण्यात आला आहे.
या अशा नियमांमुळे नागरीक भिकेला लागतील हे विसरुन चालणार नाही. सरकारच्या पाच किलो गहु अथवा तांदळाने नागरीकांचे पोट भरणार नाही असेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. कार मध्ये चालकासह फक्त तिन जनांनी बसायचे हा आणखी एक अजब नियम नागरीकांना त्रासून सोडत आहे. चौथा नागरीक बसला तर कोरोनाचा प्रकोप वाढणार आहे काय? असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे. घरात एका ताटात जेवणारे परीवारातील सदस्य एका दुचाकीवर प्रवास करु शकत नाही. एखाद्याला आपल्या वडीलाला दवाखान्यात न्यायचे असेल तर टॅक्सी नसल्यामुळे दुचाकी वर नेता येत नाही. आपली पत्नी अथवा मुलाला सुध्दा दुचाकी वर बाहेर नेता येत नाही. या अशा उरफाट्या नियमांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता येणार आहे काय?
असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. स्वताच्या दुचाकीचा वापर मनुष्य स्वताच्याच कुटंबाकरीता करीत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे नियम लाऊन सर्वच नागरीकांना छळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पोलिस कर्मचारी मात्र डबल सिट बसून दुचाकीवर गस्त घालण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले आहे. सलून वाल्यांना कटींग करायला परवानगी देण्यात आली मात्र दाढीची परवानगी नाकारण्यात आली. वास्तविक कटींग करतांना ग्राहक तसेच कटींग करणा-याचे अंतर इतके कमी असते कि दोघांपैकी कुणीही बाधीत असेल तर कोरोनाचा संसर्ग दुस-याला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दाढी करत आहे कि कटींग हा विषयच समोर येत नाही.
